खामगाव: शहरात चोरी करून आणि दहशत निर्माण करणाऱ्या एकावर एमपीडीएतंर्गत कारवाई करण्यात आली आहे. परिणामी या दादास आता ११ महिन्यांसाठी न्यायालयीन कोठडीत रहावे लागणार आहे. यामुळे शहरातील असामाजिक तत्वांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
खामगाव येथील कोठारी फैल भागातील ऋतिक रमेश इंगळे हा गुंडप्रवत्तीचा असून त्याचे विरुध्द मारामारी करणे, दंगल करणे, चोऱ्या करणे दुखापत करणे, विनयभंग करणे, बेकायदेशिर शस्त्र बाळगणे, अवैध दारु विक्री करणे अशा प्रकारचे दखलपात्र एकुण ८ गुन्हे करुन खामगांव शहरात दहशत निर्माण केली होती. दरम्यान, त्याचे विरुध्द वेळोवेळी प्रतिबंधक कार्यवाईसुध्दा करण्यात आली. परंतु त्याचे वागणुकीमध्ये काही एक बदल झाला नाही, तो दादागिरी करुन, दहशत निर्माण करून, सर्वसाधारण जनतेच्या मनात भिती निर्माण करुन त्यांचे जिवितास धोका पोहोचवून सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा पोहचवित होता.
त्याच्या गुन्हेगारी व धोकादायक कारवायामुळे पोलीस स्टेशन खामगांव शहर हददीत तसेच आसपासचे परिसरात दहशत निर्माण झाली होती. त्यामुळे त्याचे विरुध्द पोलीस अधिक्षक सुनील कडासने, अपर पोलीस अधिक्षक अशोक थोरात, उपविभागीय पोलीस अधिकारी विनोद ठाकरे यांच्या मार्गदर्शनात तत्कालीन पोलिस निरिक्षक शांतीकुमार पाटील, पोलीस निरिक्षक सुरेश नाईकनवरे, पोउपनि पंकज सपकाळे, सफौ. सतिष चोपडे, पोहेकॉ अरुण हेलोडे, पो कॉ राम धामोळे यांनी एमपीडीएअंर्गत (महाराष्ट्र झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायदा) प्रस्ताव तयार केला.
संबंधित प्रस्ताव जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांच्याकडे पाठविण्यात आला होता. जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रस्तावावर सर्वंकष चौकशी करून अनुषंगीक कार्यवही करण्यास मान्यता दिली. त्यामुळे याला आता ११ महिन्यासाठी बुलढाणा कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे.