चोरट्यांचा गुरांवर डोळा
देऊळगाव मही: भुरट्या चोरट्यांनी आता आपला मोर्चा गुरांकडे वळविला आहे. येथील एकनाथ सखाराम शिंगणे यांच्या मालकीची बैलजोडी अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना दोन दिवसांपूर्वी घडली होती. या घटनेमुळे इतर शेतकऱ्यांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे या चोरट्यांचा शोध लावण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
तापमान वाढल्याने नागरिक त्रस्त
किनगाव राजा : तापमानात वाढ झाल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. दुपारी प्रचंड उकाडा जाणवत असल्याने अंगाची लाहीलाही होते. अंगावर थंड पाण्याचा फवारा घेण्याची इच्छा होते. उकाड्यापासून सुटका करण्यासाठी पोहण्याचा आनंद घेतला जायचा. परंतु लॉकडाऊनमुळे घराबाहेर पडता येत नाही.
फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करणे गरजेचे
दुसरबीड : कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्ह्यात मधल्या काळात मिनी लॉकडाऊन करण्यात आले होते. अत्यावश्यक सेवा आणि व्यापाऱ्यांना दिवसा मर्यादित कालावधीत दुकाने उघडी ठेवण्याची मुभा दिली गेली होती. मात्र व्यावसायिक तथा ग्राहकांकडून अद्यापही शारीरिक अंतराचे पालन केल्या जात नाही. त्यामुळे कोरोना संसर्ग वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे.
नागरिकांना वॉटर एटीएमचा आधार
सिंदखेड राजा : उन्हाळ्याची चाहूल लागली असून टंचाईची तीव्रता वाढत आहे. त्यामुळे येथील नागरिकांना वॉटर एटीएमचा आधार मिळत आहे. मात्र वॉटर एटीएममध्ये टाकण्यासाठी नाण्यांची गरज भासते. त्यामुळे सिंदखेड राजा शहर परिसरात नाण्यांचा तुटवडा भासत असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. संचारबंदीमुळे आर ओ कॅन घरपोच मिळत नाही. त्यामुळे वॉटर एटीएमचा आधार घ्यावा लागत आहे.
पैसे काढण्यासाठी बँकांमध्ये गर्दी
साखरखेर्डा : केंद्र शासनाने जनधन योजनेच्या खात्यात ५०० रुपये जमा केले आहेत. लवकर पैसे काढले नाही तर ते परत जातील या भीतीपोटी नागरिकांची बँकांमध्ये गर्दी होत आहे. यामुळे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडत असल्याचे चित्र आहे.
मास्क वापराकडे दुर्लक्ष
सिंदखेड राजा : कोरोनाचे संक्रमण जिल्ह्यात वाढत असतानाच कोरोना प्रतिबंधासाठी आवश्यक असलेल्या त्रिसूत्रीचे ग्राहक व व्यापाऱ्यांकडून पालन होत नसल्याचे चित्र आहे. मास्क वापराकडेही दुर्लक्ष होत आहे. जिल्ह्यात १००० व्यक्तीमागे सात जणांना कोरोना होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे मास्क वापरणे गरजेचे झाले आहे.