अर्ध्या तासात चार वेळा काढले पैसेमोताळा: येथील विनोद पुंडलीक गवळी या अल्पभूधारक शेतकऱ्यास स्टेट बँकेचा अधिकारी असल्याचे भासवत "एटीएम" वरील कोड विचारून आॅनलाइन २८ हजार ९९७ रुपए बँक खात्यातून काढून फसविल्याचा प्रकर उघडकीस आला. या प्रकरणी पीडित शेतकऱ्यांने बँकेच्या शाखेसह पोलिस स्टेशनमध्ये धाव घेतली मात्र शेतकऱ्याला कोणताही दिलासा मिळाला नाही.या बाबत अधिक माहिती अशी की, पिंपळपाटी येथील शेतकरी विनोद पुंडलीक गवळी हे अल्पभूधारक शेतकरी आहेत. परिस्थिती जेमतेम असून, शेलापूर ता. मोताळा येथील भारतीय स्टेट बँकेत त्यांचे बचत खाते आहे. ३० मार्च रोजी दुपारी पाऊन वाजता त्यांच्या मोबाईलवर एका व्यक्तीचा फोन आला. मी मुंबईच्या बांद्रा हेडआॅफिसमधून रोहितकुमार शर्मा बोलतो आहे, तुमच्या एटीएमची मुदत संपली आहे. तुम्हाला मुदत वाढवून पाहिजे असल्यास रजिस्ट्रेशन करावे लागेल. असे सांगून त्यांने विनोद गवळी यांना रजिस्ट्रेशनसाठी एक हजार रूपय खर्च येईल. त्यासाठी तोतया व्यक्तीने गवळी यांना एटीएमचे मागील पुढील क्रमांक विचारले. हे क्रमांक घेतल्यावर तुम्हाला एक एसएमएस येईल असे सांगितले. थोड्यावेळाने एटीएमचा "ओटीपी" (आॅनलाईन ट्रान्झक्शन पावर्ड) विचारला. गवळी यांनी तोही क्रमांक दिला. ही सर्व माहिती संबंधित व्यक्तीने विश्वासात घेऊन विचारली. मोबाइल बंद झाल्यावर गवळी यांच्या खात्यातील ४ हजार ९९९ रुपए, ९ हजार ९९९, ९ हजार ९९९ व ४ हजार रुपए काढण्यात आल्याचा संदेश प्राप्त झाला. मात्र गवळी यांनी मोबाइलवरील संदेश न पाहताच, शेलापूर शाखेत एटीएमची मुदत कशी संपली याबाबत चौकशी केली असता, तुमची एटीएमची मुदत संपली नाही मात्र तुमच्या खात्यातून २८ हजार ९९७ रुपए काढल्याचे शाखाधिकारी यांनी सांगितले. हा आॅनलाइन गंडविण्याचा प्रकार ऐकूण विनोद गवळी यांना धक्काच बसला. सदर शेतकऱ्याने नुकताच कापूस विकला असून, कुटुंबासाठी ज्वारी आदी धान्य खरेदी करण्यासाठी पैसे बँकेत ठेवले होते. आपली फसवणूक झाल्याची खात्री पटल्यानंतर गवळी यांनी बोराखेडी पोलिस स्टेशन गाठले. या ठिकाणी पोलिस कर्मचाऱ्यांनी ७४९१८६३६११ या तोतया व्यक्तीच्या मोबाइलवर संवाद साधून धमकावले. सवांदादरम्यान तोतया व्यक्तीने थोड्यावेळात पैसे परत करतो असे सांगितले मात्र पैसे आले नाही. फसवणूक करणाऱ्या व्यक्तीचा मोबाइल क्रमांक व व्यवहार तपासला असता, दिल्लीवरून हा प्रकार झाल्याचा अंदाज शेलापूर बँक शाखाधिकाऱ्याने व्यक्त केला आहे. या आॅनलाइन प्रकाराने शेतकऱ्यासमोर आभाळ कोसळले असून, आॅनलाईन फसवणुकीबाबत त्याला कोणताही दिलासा मिळाला नाही. पोलिसांक डूनही मदत मिळाली नसून या प्रकाराबाबत बँकेचे प्रशासनही हतबल असल्याचे दिसून आले.
अल्पभूधारक शेतकऱ्यास २९ हजारांचा आॅनलाइन गंडा
By admin | Published: March 31, 2017 7:32 PM