- अनिल गवई
लोकमत न्यूज नेटवर्क खामगाव: खामगाव-शेगाव तालुक्यातील रेती घाटामधून शासनाला एक रुपयाही न भरता वाळूतस्कर हजारो ब्रास रेतीचा उपसा करीत आहेत. त्यामुळे शासनाला जाणारा कोट्यवधींचा महसूल तस्करांच्या खिशात जात आहे. याला प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष शासकीय व राजकीय यंत्रणेचीही साथ लाभत असल्याने वाळूतस्कर महसुल यंत्रणेच्या नियंत्रणाबाहेर गेल्याचे चित्र जिल्ह्यात आहे.नदी-नाल्यातील वाळू हा शासनाच्या महसुलाच्या प्रमुख स्त्रोतांपैकी एक आहे. परंतु, खामगाव-शेगाव तालुक्यातील घाटांचा लिलाव न झाल्याने शासनाचा कोट्यवधींचा महसूल बुडतो असतानाही प्रत्यक्षात या घाटांमधून मोठया प्रमाणात रेतीचा उपसा राजरोसपणे सुरू आहे. महसूल यंत्रणाही कुठे प्रामाणिकपणे तर कुठे केवळ देखाव्यासाठी कारवाईचा बागुलबुवा उभा करताना दिसत आहे. खामगाव- शेगाव तालुक्यांमध्ये वाळूतस्करांची प्रचंड दहशत आहे.
२४ बाय ७ पथक नावालाच!वाळू तस्करी रोखण्यासाठी 24 बाय 7 पथक गठीत करण्यात आले आहे. मात्र, या पथकातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे रेती तस्करांशी साटेलोटे आहेत. त्यामुळे खामगाव शहरात जलंब-पिंपळगाव राजा, शेगाव, शेलोडी, बुलडाणा मार्गे मोठ्याप्रमाणात रेती वाहतूक केली जात आहे.
रेती तस्करी रोखण्यासाठी दिवसा आणि रात्री देखील वेगळे पथक गठीत केले आहे. नुकत्याच ४-५ कारवाई केल्या आहेत. रेती घाटांचे लिलाव झाले नसल्याने रेती तस्करी रोखण्यासाठी सर्वच विभागाच्या सामुहिक प्रयत्नांची गरज आहे.- अतुल पाटोळेतहसीलदार, खामगाव.