खामगाव, दि. २६-येथील नगरपालिकेत मंगळवारी नवनिर्वाचित नगराध्यक्ष पदभार स्वीकारणार आहेत. या पृष्ठभूमीवर सोमवारी पालिकेत चांगलेच राजकीय नाट्य रंगले. दरम्यान, मावळत्या नगराध्यक्षांनी नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार केला. पालिका इमारतीला जलाभिषेक करून स्वच्छता करण्यात आली.खामगाव नगरपालिकेतील नगराध्यक्ष पदासह ३३ नगरसेवकांच्या निवडीसाठी गेल्या २७ नोव्हेंबर रोजी मतदानाची प्रक्रिया पार पडली. २८ नोव्हेंबर रोजी या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. मात्र, मावळत्या नगराध्यक्षांचा कार्यकाळ संपुष्टात येण्यापूर्वीच निवडणुका जाहीर झाल्याने, नियमानुसार नगराध्यक्ष आणि पदाधिकार्यांचा कार्यकाळ संपुष्टात येण्यापूर्वी नवीन नगराध्यक्षांसह नगरसेवकांना पदभार स्वीकारण्याची तांत्रिक अडचण निर्माण झाली. तथापि, सोमवार, २६ डिसेंबर रोजी मावळत्या नगराध्यक्षांसह पदाधिकार्यांचा कार्यकाळ संपुष्टात आला. त्यांनी आपल्या पदाचा कार्यभार सोडण्यापूर्वी नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार केला. तसेच विभागप्रमुखांची बैठकही बोलाविली. त्याचवेळी मंगळवारच्या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी नवीन सत्ताधार्यांकडून पालिकेत विभागप्रमुख आणि कर्मचार्यांची बैठक बोलाविण्यात आली. या बैठकीत उपस्थित राहण्यावरून कर्मचार्यांमध्ये मानापमान नाट्यही घडले. दरम्यान, मावळत्या नगराध्यक्षांची बैठक संपताच, नवीन सत्ताधार्यांच्या माध्यमातून पालिका कर्मचार्यांनी नगरपालिकेच्या प्रशासकीय इमारतीची स्वच्छता केली. तसेच यावेळी इमारतीला जलाभिषेकही करण्यात आला. नगराध्यक्ष आज स्वीकारणार पदभार!मावळत्या नगराध्यक्षांसह पदाधिकार्यांचा कार्यकाळ संपुष्टात आल्यानंतर नवनिर्वाचित नगराध्यक्ष तथा नगरसेवक मंगळवारी आपल्या पदाचा पदभार स्वीकारणार आहेत. नगराध्यक्षांच्या पदग्रहण सोहळ्यासाठी सत्ताधार्यांकडून खास व्यवस्था करण्यात आली असून, पालिका इमारतीवर विद्युत रोषणाईही करण्यात आली. या सोहळ्याला राज्याचे कृषीमंत्री ना. भाऊसाहेब फुंडकर, खामगाव मतदारसंघाचे आ. आकाश फुंडकर यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे.
सत्तांतरापूर्वी खामगाव पालिका इमारतीला जलाभिषेक!
By admin | Published: December 27, 2016 2:20 AM