लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: आठ डिसेंबर रोजी जिल्ह्यातील ११ ग्रामपंचायतींमधील पोटनिवडणूक होत असून त्यादृष्टीने प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. या निवडणुकीसाठी २२ मतदान केंद्र राहणार असून त्यासाठी ११० कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.आठ डिसेंबर रोजी सकाळी साडेसात ते साडेपाच या कालावधीत ही निवडणूक होत असून नऊ डिसेंबर रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार आहेत. मुळात जिल्ह्यात एकूण ८५ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला होता. यातील दोन ठिकाणच्या निवडणुकाला विभागीय आयुक्तांनी स्थगिती दिली होती. त्यामुळे प्रत्यक्षात ८३ ग्रामपंचायतीमधील ५ सरपंच व १२३ सदस्यपदांसाठी इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. २५ नोव्हेंबर रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारिख होती. त्या दिवशी अनेक ठिकाणी उमेदवारी अर्ज मागे घेण्यात आल्याने बहुतांश ठिकाणच्या निवडणुका या अविरोध झाल्या. त्यामुळे आता प्रत्यक्षात ११ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक होत आहे. मेहकर तालुक्यातील भालेगावमध्ये सरपंचपदासाठी, हिवरखेड येथे सदस्यपदासाठी, चिखलीमध्ये भानखेड ग्रामंपचायत सदस्यपदासाठी, सिंदखेड राजा तालुक्यात चांगेफळच्या सदस्यपदासाठी, मोताळा तालुक्यातील कोल्ही गोलारच्या सदस्यपदासाठी, शेगावातील पहुरजिराच्या सदस्यासाठी प्रामुख्याने ही निवडणूक होत आहे. दुसरीकडे खामगाव तालुक्यातील माटरगावच्या सरपंच, घाटपुरी, पिंपळगाव राजा येथे सदस्यपदासाठी तर लोणारमध्ये खुरमपूर, वढव गावाच्या सरपंचपदासाठी ही निवडणूक होत आहे. एकंदरीत स्थिती पाहता आता प्रत्यक्षात सात तालुक्यातील ग्रामपंचायतींसाठी ही निवडणूक होत आहे. त्यादृष्टीने प्रशासनाने तयारी सुरू केली असून ती अंतिम टप्प्यात आली आहे. निवडणुकीच्या अनुषंगाने शेगाव आणि सिंदखेड राजा तालुक्यात प्रत्येकी एक खामगाव तालुक्यात सहा, लोणार व मेहकरमध्ये प्रत्येकी पाच, मोताळा आणि चिखली तालुक्यात प्रत्येकी दोन या प्रमाणे मतदान केंद्र राहणार आहे. या निवडणुकीसाठी पोलिस बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे.
ग्रामपंचायत निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 02, 2019 4:11 PM