दुसऱ्या लाटेचा जोर ओसरत असला तरी प्रशासनाने कठोर निर्बंधामध्ये मर्यादित स्वरुपातच सूट दिली आहे. त्यावरून प्रशासकीय पातळीवरही संभाव्य तिसऱ्या लाटेला गंभीरतेने घेतले गेले असल्याचे एकंदरीत चित्र आहे. त्यातच अनलॉकसाठीही प्रशासनावर व्यापारी, लघु व्यावसायिकांचा दबाव येत असला तरी संपूर्ण बाबींची शहानिशा केल्यानंतरच प्रशासकीय पातळीवर निर्णय घेतला जाऊ शकतो. मात्र, सध्या तरी जिल्ह्यातील कोरोनाची स्थिती, राज्य व केंद्राचे निर्देश त्यासंदर्भाने पॉझिटिव्हीटी रेट, मृत्यूदर, डबलिंग रेट, महिन्याचा पॉझिटिव्हिटी रेट, आठवड्याचा पॉझिटिव्हीटी रेट अशा अनेक आकड्यांची सध्या प्रशासकीय पातळीवर काथ्याकूट सुरू आहे. त्यामुळे मर्यादित अनलॉकसुद्धा तूर्तास तरी अवघड असल्याचे एकंदरीत स्थिती आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील एका अधिकाऱ्यानेही नाव न सांगण्याच्या अटीवर त्यास दुजोरा दिला आहे.
--साप्ताहिक पॉझिटिव्हिटी रेट ६.९७--
कोरोनाचे संक्रमण कमी होत असले तरी ग्रामीण भागात कोरोना वाढत आहे. २८ मे ते ३ जून दरम्यान बुलडाणा जिल्ह्यात २८ हजार ५३९ संदिग्धांची कोरोना तपासणी करण्यात आली होती. त्यात १ हजार ९९१ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. थोडक्यात या सात दिवसांचा पॉझिटिव्हिटी रेट हा ६.९७ टक्के आहे.
--७० टक्के रुग्ण ग्रामीण भागात--
मे महिन्यातील कोरोना संसर्गाची एकंदर व्याप्ती पाहता तब्बल ७० टक्के रुग्ण हे ग्रामीण भागातील असल्याचे प्रशासनाच्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. त्यामुळे शहरी भागात काही प्रमाणात कोरोनाचा संसर्ग कमी झाला असला तरी ग्रामीण भागात या कोरोनाची व्याप्ती अद्यापही वाढत असल्याचे एकंदरीत चित्र आहे.