बुलडाणा : महाराष्ट लाेकसेवा आयाेगाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या अभियांत्रिकी पूर्वपरीक्षेचे प्रवेशपत्र जारी करण्यात आले आहे. राज्यभरातील विविध केंद्रांवर ही परीक्षा येत्या २७ मार्चला हाेणार आहे. महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा-२०२० करीता उमेदवारांची प्रवेश प्रमाणपत्रे आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीच्या संकेतस्थळावर उमेदवारांच्या प्रोफाईलद्वारे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. परीक्षा कक्षात प्रवेश मिळविण्यासाठी आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीच्या संकेतस्थळावरून डाऊनलोड करून प्रिंट केलेले मूळ स्वरूपातील प्रवेश प्रमाणपत्र सोबत आणणे अनिवार्य आहे. परीक्षेच्या वेळी प्रवेश प्रमाणपत्र आणणे सक्तीचे आहे. त्याशिवाय परीक्षेस प्रवेश दिला जाणार नसल्याचे आयाेगाने म्हटले आहे. परीक्षेस येताना उमेदवारांना ओळखीच्या पुराव्यासाठी स्वत:चे आधारकार्ड, निवडणूक आयोगाचे ओळखपत्र, पासपोर्ट, पॅनकार्ड व स्मार्टकार्ड प्रकारचे ड्रायव्हिंग लायसन्स यापैकी किमान कोणतेही एक मूळ ओळखपत्र तसेच उमेदवाराचे छायाचित्र व इतर
मजकूर सुस्पष्टपणे दिसेल अशी मूळ ओळखपत्राची छायांकित प्रत सादर करणे अनिवार्य करण्यात आले आहे. परीक्षा सुरू होण्याच्या वेळेपूर्वी किमान दीड तास अगोदर संबंधित परीक्षा उपकेंद्रावर उपस्थित राहणे आवश्यक आहे तसेच, प्रत्यक्ष परीक्षा सुरू होण्याच्या वेळेपूर्वी एक तास अगोदर परीक्षा कक्षातील स्वत:च्या बैठक क्रमांकावर उपस्थित राहणे अनिवार्य आहे. परीक्षा कक्षातील अंतिम प्रवेशासाठी विहीत केलेल्या वेळेनंतर कोणत्याही परिस्थितीत उमेदवारांना परीक्षा कक्षामध्ये प्रवेश दिला जाणार नसल्याचे आयाेगाने म्हटले आहे. कोविड-१९ विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर आयोगाकडून प्रवेश प्रमाणपत्रावर दिलेल्या सूचनांचे तसेच स्थानिक प्राधिकरणाकडून करण्यात आलेल्या उपाययोजनांचे पालन करणे अनिवार्य राहणार आहे.