लोकमत न्यूज नेटवर्कदेऊळगावमही: आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील इयत्ता आठवीमध्ये शिक्षण घेत असलेल्या आतिष गणेश ताठे या विद्यार्थ्याला पुढील शिक्षणासाठी मंडळ अधिकारी संजय टाके यांनी दत्तक घेतले आहे. शासन सेवेबरोबर सामाजिक बांधीलकी जोपासत आत्महत्याग्रस्त कुटुंबातील विद्यार्थ्याच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारत त्यांनी एक आदर्श निर्माण केला आहे. देऊळगावराजा तालुक्यातील सरंबा येथील गणेश सखाराम ताठे यांनी सततची नापिकी, गारपीट तर कधी कोरड्या दुष्काळामुळे कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या करून जीवनयात्रा संपवली. यामुळे ताठे कुटुंबावर संकटाचा डोंगर कोसळला होता. या सर्व परिस्थितीमुळे इयत्ता आठवीत शिक्षण घेणाऱ्या आतिष ताठे या विद्यार्थ्याला शिक्षण घेणेदेखील कठीण झाले होते. मंडळ अधिकारी संजय टाके यांनी या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती जाणून घेतल्यानंतर त्या कुटुंबाला धीर देऊन तुम्ही स्वत: खचून न जाता आतिषकडे पाहून त्याच्या उज्ज्वल भविष्याची स्वप्न पाहा, असे सांगत चांगलाच धीर दिला. मंडळ अधिकारी टाके यांनी तत्काळ आतिषच्या पुढील संपूर्ण शिक्षणाची जबाबदारी स्वीकारून त्यांनी आतिषला शिक्षणासाठी दत्तक घेतले. आतिषला शालेय साहित्य, पुस्तके, वह्या, पेन, दप्तर बूट यासह विविध सहित्यांची खरेदी करून दिली. त्याचबरोबर मयत शेतकऱ्यांच्या वारसाच्या नावे शेतजमीन करून ७/१२ व गाव नमुना ८ ची प्रतदेखील तातडीने त्यांच्या स्वाधीन केली. यापूर्वीसुद्धा अंढेरा येथील मातृपितृछत्र हरवलेल्या वैद्य कुंटुबातील मंदाकिनी हिच्या विवाह सोहळ्याला आर्थिक मदत व तहसील कर्मचारी यांच्या वतीने शिलाई मशीन दिली होती. तर भाऊ गणेश वैद्य याला बालवयातच घरातील कर्ता पुरुष करून शिधापत्रिका नावे करून रेशनचा लाभ घेता यावा, यासाठी आपली प्रमाणिक तत्परता दाखवली होती. मंडळ अधिकारी संजय टाके यांचे सामाजिक क्षेत्रात सदैव योगदान असते. त्यांच्या या सामाजिक कार्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
आत्महत्याग्रस्त कुटुंबातील मुलास शिक्षणासाठी मंडळ अधिकाऱ्याने घेतले दत्तक!
By admin | Published: July 17, 2017 2:00 AM