बुलढाणा : कधी काळी ॲथलेटिक्समध्ये दबदबा असलेल्या बुलढाणा शहरात तब्बल १९ वर्षांनंतर रविवारी राज्यस्तरीय क्रॉसकंट्री स्पर्धा होत आहे. रविवारी सकाळी ७ वाजता ही स्पर्धा होणार असून राज्यातील ५०७ खेळाडू, पंच व क्रीडा क्षेत्रातील मान्यवर असे ७०० जण उपस्थित राहणार आहेत. या स्पर्धेची तयारी अंतिम टप्प्यात आली असून तांत्रिक समितीचे वसंत गोखले, सुमंत वाईकर आणि ॲम्युचअर ॲथलेटिक्स संघटनेचे जिल्हा सचिव गोपालसिंग राजपूत, ॲथलेटिक्स कोच विजय वानखेडे यांनी शनिवारी सायंकाळी क्रॉसकंट्री स्पर्धेच्या संपूर्ण मार्गाची पहाणीही केली.
ही स्पर्धा महाराष्ट्र ॲथेलिटिक्स असोसिएशन आणि बुलढाणा जिल्हा ॲम्युचअर ॲथलेटिक्स असोसिएशनच्या वतीने घेण्यात येत आहे. या स्पर्धेसंदर्भात ११ डिसेंबर रोजी एक छोटेखानी बैठक होऊन त्यात स्पर्धेच्या नियोजनाच्या तयारीला आकार देण्यात आला होता. १६ डिसेंबर रोजी राज्यातून नामवंत ॲथलिट्स, आंतरराष्ट्रीय स्तरावरही चांगली कामगिरी करणारे काही खेळाडू या स्पर्धेत सहभागी होत असल्याने स्पर्धेत रंगत वाढली आहे. विशेष म्हणजे या स्पर्धेतून राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा संघ निवडल्या जाणार आहे. त्यामुळे या स्पर्धेला महत्त्व प्राप्त झाले आहे. सोबतच या स्पर्धेचा बुलढाण्यातील खेळाडूंनाही प्रत्यक्ष मोठ्या स्पर्धेत सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. स्पर्धेसाठी येणाऱ्या धावपटूंची सहकार विद्यामंदिरामध्ये निवास व्यवस्था करण्यात आली आहे.
नियम बदलानंतरची चौथी स्पर्धाॲथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडियाच्या नियमानुसार शहरामध्ये क्रॉसकंट्री घेण्याच्या नियमामध्ये बदल करण्यात आलेला आहे. या बदलेल्या नियमानुसारची ही आतापर्यंतची दुसरी स्पर्धा आहे. सहकार विद्यामंदिरानजीक माळविहीर परिसरात या स्पर्धेसाठी दोन किमीचा मार्ग बनविण्यात आला आहे. नियमानुसार त्यावर गड्डे, काही ठिकाणी पाणी टाकून हा मार्ग धावपटूंसाठी खडतर बनविण्यात आला आहे.
या गटांमध्ये होईल स्पर्धापुरुष व महिला गटात प्रत्येकी १० किमी धावणे, २० किमी वयोगटात मुलांसाठी ८ किमी (मुलींसाठी ६ किमी), १८ वर्ष वयोगटात मुलांसाठी ६ किमी (मुलींसाठी ४ किमी), १६ वर्ष वयोगटात मुले व मुलींना २ किमी धावावे लागणार आहे.