लोकमत न्यूज नेटवर्क खामगाव : सर्वत्र कोरोनाचा हाहाकार असल्याने नागरिकांपुढे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशातच आता महागाईनेही डोके वर काढल्यामुळे शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांचे जगणे कठीण झाले आहे. सध्या खाद्यतेलाने चांगलाच भाव खाल्ला असताना डाळींचे दरही कडाडले आहेत. परिणामी अनेकांच्या ताटात वरण नसल्यागत झाले आहे.कोरोनाच्या महामारीत नागरिकांची रोगप्रतिकार क्षमता वाढविणे महत्त्वाचे आहे. त्याकरिता नियमित सकस आहाराची आवश्यकता आहे. याकरिता रोजच्या जेवणात डाळींचे वरण हा मोठा आधार ठरतो; परंतु आता डाळींच्या दराने शतक पार केल्यामुळे ते सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहे. नित्य वापरातील सोयाबीन तेलाचे दर १६० रुपये प्रतिकिलो झाले आहेत.या भावात सातत्याने वाढ होत असून, यापाठोपाठ डाळींच्या दरांनीही उच्चांक गाठला आहे. अपवाद वगळता सर्व डाळींचे दर शंभरावर असल्याने ही महागडी डाळ सर्वसामान्य वर्गाला विकत घेणे परवडणारी नाही. त्यामुळे सामान्यांच्या नित्य भोजनातील वरण नाहीसे होणार का, अशी चिंता सर्वसामान्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लावलेल्या निर्बंधांमुळे अनेकांचा रोजगार हिरावल्याने हाताला काम नाही. मजूर वर्ग कमालीचा निराश व चिंतेत आहे. यातच महागाईनेही भर घातल्याने मजूरवर्ग आता दुहेरी संकटात सापडल्याचे चित्र सर्वत्र दिसून येत आहे. जीवनावश्यक वस्तुंचे भाव कमी करून सर्वसामान्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी नागरीकांमधून करण्यात येत आहे. का झाली डाळींच्या दरात वाढ? n यावर्षी खरीप हंगामातील पिकांना सततचा पाऊस आणि किडींच्या प्रादुर्भावाने चांगलाच दणका दिला. याचा परिणाम तूर पिकावरही झाला असून, बऱ्याच शेतकऱ्यांची तूर सततच्या पावसाने करपून गेली. काहींना किडीच्या प्रादुर्भावामुळे फारसे उत्पादन होऊ शकले नाही. n हरभरा, मूग आणि उडीद आदी पिकांचीही हीच अवस्था राहिल्याने उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली. बऱ्याच शेतकयांचा लावलेला खर्चही भरून निघाला नाही. त्यामुळे बाजारात आता डाळीच्या किमती वाढायला लागल्या आहेत.
रोजच्या जेवणात तुरीची डाळ हा अविभाज्य घटक आहे. लहान मुलांसह वृद्धांनासुद्धा जेवणात वरण अत्यावश्यक असते. आता डाळीचे भाव वाढल्याने गृहिणींचे बजेटही चांगलेच वाढले आहे. -वंदना करांगळे, गृहिणी
स्वयंपाक घरात नित्य वापरात येणाऱ्या सर्वच वस्तूंचे दर भरमसाठ वाढले आहेत. गॅस सिलिंडर, खाद्यतेल, मिरची-मसाला यासोबतच डाळींचेही दर वाढल्याने आता या महागाईत जगावे कसे, हा प्रश्न आहे.- प्रमिला मोरे, गृहिणी