लोकमत न्यूज नेटवर्कशेगाव : कोरोना विषाणू संक्रमणाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी बुलडाणा जिल्ह्यातील धार्मिक स्थळं मार्च महिन्यांपासून बंद होती. यामध्ये बुलडाणा जिल्ह्यातील श्री गजानन महाराज संस्थानचाही समावेश होता. मंगळवारी मंदिर खुले होताच शेगावातील वर्दळ अचानक वाढली. सोमवारी रात्रीच दूरवरचे काही भाविक दर्शनासाठी दाखल झाले. त्यामुळे संत गजानन महाराज संस्थानच्या विसावा आणि भक्त संकुलमधील रूम फुल्ल झाल्या होत्या. काही भाविक खासगी लॉजमध्येही थांबले होते. परिणामी, गत आठ महिन्यांपासून बंद असलेले लाॅजही उघडण्यात आले. एसटी बस आणि खासगी प्रवासी वाहतुकीने शेगावात दाखल झालेल्या हजारो भाविकांनी ऑटो रिक्षा आणि इतर वाहनांना मंदिरात येण्यासाठी प्राधान्य दिलेे. त्यामुळे खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांनाही अचानक दिलासा मिळाला. हॉटेल आणि लॉज व्यावसायिकांनीही मंदिर उघडल्याचे समाधान व्यक्त केले. बंद असलेला व्यवसाय सुरू होऊन विस्कटलेली आर्थिक घडी रुळावर आणण्यासाठी मंदिर उघडण्याचा निर्णय अतिशय योग्य असल्याचे भास्कर जाधव यांनी सांगितले.हार फुलविक्रेत्यांच्या चेहऱ्यावरही मंगळवारी समाधान दिसून आले. मंदिरात हार फुले आणि प्रसाद आणण्यास मनाई असली तरी शेगावात येणारे भाविक घरी नेण्यासाठी प्रसाद आणि हार खरेदी करीत असल्याचे सत्यभामा तायडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. दरम्यान, सोमवारी रात्री मुक्कामी आलेल्या भाविकांमुळे हॉटेल आणि लॉजींग व्यवसाय तेजीत आला आहे. काही भाविक स्वत:च्या वाहनाने शेगावात येत असल्याने काहींच्या हाताला पार्किगच्या माध्यमातून काम मिळाल्याचे चित्र मंगळवारी संतनगरीत दिसून आले. अष्टगंध, कुंकु आणि इतर साहित्य विक्री करणाऱ्या महिलांनी मंदिराच्या प्रवेशद्वारावर विविध साहित्याची दुकाने थाटली होती. या दुकानांवरूनही भाविकांनी खरेदी केल्याचे दिसून आले.
आर्थिक घडी हळूहळू पूर्वपदावरविदर्भ पंढरीनाथ संत गजानन महाराजांचे मंदिर मंगळवारी खुले करण्यात आले. त्यामुळे गत आठ मंहिन्यांपासून शेगावची विस्कटलेली आर्थिक घडी आता हळूहळू पूर्वपदावर येणार असल्याचे संकेत आहेत. मंगळवारी पहिल्याच दिवशी मोठ्याप्रमाणात भाविक दाखल झाले. परिणामी, पार्किंग आणि वाहन व्यवस्थेला चालना मिळाल्याचे दिसून आले. चहा, नास्ता, खानावळ आणि हॉटेल व्यवसायालाही लाभ होणार असल्याचे मंगळवारी दिसून आले.