विभागीय आयुक्तांनी गेल्या महिन्यातच एसडीअेा, तहसीलदारांची ऑनलाईन बैठक घेऊन पावसाळ्याच्या दृष्टीने यंत्रणेला सतर्कतेचे आदेश दिले आहेत. यासोबतच संभाव्य पूरग्रस्त गावे म्हणून गणल्या जाणाऱ्या २६७ गावात पूरनियंत्रण समित्या स्थापन करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुषंगाने यंत्रणेने हालचाली सुरू केल्या आहे. बुलडाणा जिल्ह्यात १४ नद्या असून पैनगंगा, खडकपूर्णा आणि पूर्णा या प्रमुख मोठ्या नद्या आहेत. प्रामुख्याने जिल्ह्यातील १३ पैकी पाच तालुक्यांतील गावे पुरामुळे बाधित होऊ शकतात. यामध्ये मोताळा, मलकापूर,, खामगाव, नांदुरा, मेहकर या तालुक्यांचा समावेश आहे. संभाव्य पूरपरिस्थितीसाठी आपत्ती व्यवस्थापन विभाग सज्ज झाला आहे. पट्टीचे पोहणाऱ्यांचीही यादी अद्ययावत केली आहे. जिल्हास्तरावरही शोध व बचावपथक तयार ठेवण्यात आले आहे. तहसीलस्तरावरही याबाबत सज्जता ठेवण्यात आली आहे.
--पूरबाधित क्षेत्र--
जिल्ह्यातील पाच तालुक्यांतील गावे प्रामुख्याने पुरामुळे बाधित होता. या गावांमधील २६७ गावे संभाव्य पूरग्रस्त गावे आहेत. त्यापैकी ८६ गावे हे अतिप्रवण क्षेत्रातील आहेत. त्यानुषंगाने या गावात पूरनियंत्रण समित्या स्थापन करण्याचे निर्देश देण्यात आले असून एसडीअेांची यासाठी नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
--दहा पोलिसांच्या सेवा अधिग्रहीत-
संभाव्य आपत्कालीन परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी दहा पोलीस कर्मचाऱ्यांच्या सेवाही जिल्हास्तरीय शोधपथकासाठी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. यासोबतच पोलिसांची एक व्हॅनही उपलब्ध करण्यात आली आहे.
--वीज अटकाव यंत्रांची दुरुस्ती--
जिल्ह्यात ज्या भागात वीज पडण्याचे प्रमाण अधिक आहे अशा भागात अर्थात किनगाव राजा, कोलारा, घारोड आणि बानबीर येथील वीज अटकाव यंत्र सुस्थितीत आहे का? याचीही चाचपणी करण्यात आली.
--प्रशासनाची अशी आहे तयारी--
-जिल्हा व तालुकास्तरावर नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात येत आहे.
-नैसर्गिक आपत्ती संदर्भात सर्व विभागांचे अधिकारी व कर्मचारी यांची भ्रमणध्वनी पुस्तिका अद्ययावत करण्यात येत आहे.
- शोध व बचावपथके सज्ज ठेवून साहित्यही सुस्थित ठेवण्यात आले आहे.
- नदीपात्र तथा नदी काठावरील अतिक्रमण काढण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
- साथरोग टाळण्यासाठी आरोग्य विभागासही सज्जतेचे निर्देश दिले आहेत.
- पालिकास्तरावरील अग्निश्यामक दलाचीही सज्जता वाढवली आहे.
--धोकादायक इमारतींची तपासणी--
शहरी भागामध्ये जुन्या वास्तू व जिर्ण झालेली घरे यांची अभियंत्यांमार्फत पाहणी, तपासणी करून या इमारती राहण्या योग्य आहेत किंवा नाही याची खात्री करण्याचे निर्देश विभागीय आयुक्तांनी मे महिन्यातच जिल्हा यंत्रणेला दिलेले आहेत.
- आपत्कालीन प्रकाश व्यवस्था, दोन रबर बोट, वायर रोप, जिल्हास्तरावरील कार्कारी गट, लाईफ जॅकेट, सिमेंट कटर आवश्यक जागांवर उपलब्ध करण्यात आले आहेत.
--
जिल्ह्यातील नद्या:- १४
पुराचा धोका असलेली गावे:- २८७
अतिप्रवण क्षेत्रातील गावे:- ८६