सुधीर चेके पाटील / चिखली(बुलडाणा): तालुक्यातील मुंगसरी या गावापाठोपाठ खोर, अंत्रीकोळी, असोला बु., बेराळा, भानखेड, भोरसी, बोरगाव वसू, डासाळा, धोत्रा भनगोजी, दिवठाणा, डोंगरगाव, कव्हळा, केळवद, किन्ही सवडत, कोलारा, मिसाळवाडी, पेठ, शेलोडी, सोनेवाडी, टाकरखेड मु. या २१ गावांनी निर्मल ग्रामकडे दमदार वाटचाल चालविली आहे. या गावांमध्ये १00 टक्के शौचालय उभारणीसाठी केवळ दीड महिन्यांचा कालावधी असून, ३१ मार्चनंतर या गावांना शौचालयांसाठी कोणत्याही प्रकारचा निधी मिळणार नाही. त्यामुळे त्यापूर्वीच लक्ष्यांक गाठणे गरजेचे असल्याने प्रशासकीय स्तरावरून शौचालये उभारणीचे प्रयत्न कसोशीने होत आहेत. शहरासह संपूर्ण चिखली तालुका हगणदरीमुक्त करण्यासाठी तालुका प्रशासनाने कंबर कसली आहे. त्यानुषंगाने गत १ फेब्रुवारी रोजी आ. राहुल बोंद्रे व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी दीपा मुधोळ यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या कार्यशाळेने स्वच्छ भारत अभियानाला गती मिळाली आहे. शौचालय बांधकामाचे यावर्षीचे उद्दिष्ट गाठण्यासाठी ३१ मार्चची ह्यडेडलाइनह्ण जाहीर झाल्याने तालुक्यातील २१ गावांमध्ये शौचालयांचे बांधकाम पूर्णत्वास नेण्यासाठी कसोशीने प्रयत्न होत आहेत. जिल्हा परिषदेच्यावतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या या वर्षाच्या हगणदरीमुक्त झालेल्या गावांच्या तालुकानिहाय यादीत चिखली तालुक्याची अवस्था अत्यंत विदारक अशीच दिसून आली आहे. तालुक्यातील केवळ मुंगसरी या एकमेव गावाने चिखली तालुक्याची नोंद घेण्यास भाग पाडल्याने कसेबसे या यादीत तालुक्याला स्थान मिळविता आले. या बाबीची गंभीर दखल आ. राहुल बोंद्रे व मुख्य कार्यकारी अधिकारी दीपा मुधोळ यांनी घेतली आणि त्यानुषंगाने पंचायत समितीच्या राजर्षी शाहू सभागृहामध्ये तालुक्यातील विविध योजनांमध्ये शौचालये १00 टक्के पूर्ण करण्यासाठी पात्र गावातील पदाधिकारी आणि अधिकारी-कर्मचार्यांसाठी झालेल्या कार्यशाळेत शौचालयांचे उद्दिष्ट पूर्ण करण्यावर भर देण्यात आला. दरम्यान, ३१ मार्चपूर्वी लक्ष्यांक पूर्ण न करणार्या अधिकारी, कर्मचार्यांवर कठोर कारवाईचे संकेतही दीपा मुधोळ यांनी दिल्याने स्वच्छ भारत अभियानाला गती मिळाली आहे.
..तर ३१ मार्चनंतर २१ गावांचे शौचालय अनुदान बंद
By admin | Published: February 16, 2016 12:50 AM