- देवेंद्र ठाकरे खामगाव: जिल्ह्यात वांग्याच्या उत्पादनात झालेली वाढ व परजिल्ह्यातून होत असलेली आवक यामुळे टोमॅटो पाठोपाठ सध्या वांग्याचे दरही कमालीचे घसरले आहेत. यामुळे भाजीपाला उत्पादक शेतकरी संकटात सापडले आहेत.बुलडाणा जिल्ह्यात साधारणपणे जळगाव जामोद, संग्रामपूर, मेहकर, चिखली व देऊळगाव राजा आदी तालुक्या भाजीपाला उत्पादन घेणाºया शेतकºयांची संख्या मोठी आहे. यात वांग्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतल्या जाते. खामगाव तालुक्यातही अनेक शेतकरी वांग्याचे उत्पादन घेतात. गेल्या महिनाभरापासून वांग्याच्या दरात सतत घसरण होत आहे. दिवाळी पुर्वी बाजारात २० किलोच्या कॅरेटला २०० ते २५० रूपये असलेला दर सध्या १०० ते १२५ रूपयांवर येऊन ठेपला आहे. किरकोळ बाजारातही अनेक ठिकाणी अतिशय कमी भावाने वांग्याची विक्री होत आहे. परिणामी शेतकºयांचा उत्पादन खर्च सुध्दा निघताना दिसत नाही. बुलडाणा जिल्ह्यात जालना, नाशिक येथून मोठ्या प्रमाणात भाजीपाल्याची आवक होते. नवनविन तंत्रज्ञाच्या साह्याने पश्चिम महाराष्ट्रात भाजीपाल्याचे विक्रमी उत्पादन घेणाºया शेतकºयांची मोठी आहे. तिकडूनही बुलडाणा जिल्ह्यात भाजीपाला मोठ्या प्रमाणावर विक्रीसाठी येतो. परिणामी बुलडाणा जिल्ह्यात पारंपारीक शेती करणाºया भाजीपाला उत्पादक शेतकºयांना मोठा फटका बसतो.
उत्पादनात सातत्य हवे!बुलडाणा जिल्ह्यात भाजीपाला उत्पादन घेणाºयांची संख्या मोठी असली, तरी यात सातत्य ठेवणारे शेतकरी बोटावर मोजण्याएवढेच आहेत. भाजीपाल्याचे दर वर्षभरात बदलत असतात. साधारणपणे हिवाळ्यात दर घसरत असल्याने यावेळी भाजीपाला उत्पादक शेतकºयांना नफा मिळत नाही. त्याचवेळी उन्हाळ्यात चांगल्यापैकी भाव मिळतो. परिणामी जे शेतकरी उत्पादनात सातत्य ठेवतात, त्यांना वर्षभरातून एक हंगाम निश्चितच नफा मिळवून देणारा ठरतो. ही परिस्थिती लक्षात घेता, भाजीपाला उत्पादक शेतकºयांनी या क्षेत्रात सातत्य ठेवणे आवश्यक असल्याचा सल्ला जळगाव जामोद येथील कृषी विज्ञान केंद्राचे फळबाग लागवड तज्ञ शशांक दाते यांनी दिला आहे.
किरकोळ विक्रीतून नुकसान भरून काढण्याचा प्रयत्न!सध्या ठोक बाजारात वांग्याचे दर ६ रूपये प्रतिकिलोवर येऊन ठेपले आहेत. यामुळे शेतकºयांचा उत्पादन खर्चही निघताना दिसत नाही. त्यामुळे अनेक शेतकरी वांग्याची ठोक बाजारात विक्री करण्यापेक्षा किरकोळ बाजारात बसणे पसंत करीत आहेत, असे जळगाव जामोद तालुक्यातील जामोद येथील भाजीपाला उत्पादक शेतकरी किसन केदार यांनी सांगितले. केदार हे सध्या जळगाव जामोद शहरासह तालुक्यात इतर बाजारांमध्येही वांग्याची किरकोळ विक्री करीत आहेत. यातून प्रतिकिलो १० रूपये एवढा भाव मिळत असल्याचे त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. असे असले, तरी भरपूर उत्पादन घेणाºया सर्वच शेतकºयांना हे शक्य नसल्याचेही केदार म्हणाले.