लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : कोरोना काळात सातत्याने होत असलेल्या भाववाढीमुळे सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहे. मात्र, तीन दिवसांपासून या भाववाढीला काही प्रमाणात ब्रेक लागला आहे. शेंगदाणा आणि सोयाबीन तेलाच्या दरात घसरण दिसून आली आहे. शेंगदाणा तेलाचे भाव प्रतिकिलो ५, तर सोयाबीन तेल ३५ रुपयांनी घसरले. भाव कमी झाल्याने गृहिणींना काहीअंशी का असेना पण दिलासा मिळाला.
मार्च २०२० पासून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने सर्वच स्तरांतील नागरिकांवर परिणाम झाला. आता कोरोनाच्या महामारीत महागाईचा मार बसत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात वाढलेल्या तेलाच्या किमती, आयात करावर दोन्ही देशांनी लावलेले आयात-निर्यात शुल्क, परदेशांत कमी झालेले उत्पन्न, कामगारांचे प्रश्न, कोरोनाचे संकट यामुळे सर्वाधिक आयात या विविध कारणांमुळे तेलाच्या किमती वाढल्या. किरकोळ बाजारात या किमतीत २० टक्क्यांनी आणखी वाढ झाली. त्यामुळे तेल २०० रुपये किलोपर्यंत विकले गेले. आता हळूहळू हे भाव नियंत्रणात येण्याचे संकेत बाजारपेठेतून मिळाले आहेत. तेलाचे भाव तीन दिवसांत ५ ते ३५ रुपयांनी घसरण्याचे मुख्य कारण हे कमोडिटी बाजारात झालेली घसरण व तेलबिया आयातीचा घेतलेला निर्णय आहे.
आधीच्या काळात शेतात सोयाबीन, करडई, शेंगदाणा यासारखे तेलपीक घेतल्यानंतर घरीच घाण्याचे तेल काढले जात होते. हेच तेल खाण्यापिण्याच्या पदार्थांमध्ये वापरले जात होते. आता ही पिके घेतली जातात; पण घरी तेल तयार करणे बंद झाले आहे.
- गणेश इंगळे, शेतकरी
सुरुवातीला घरीच तेल तयार करून स्वयंपाकात वापरले जायचे. मात्र, आता तसे राहिले नाही. तेल विकत घ्यावे लागते. या तेलाचे दर कमी असो की जास्त, याला नाइलाज आहे. स्वत:चा शेतमाल असल्यानंतरही तेल तयार करता येत नाही.
- अमाेल क्षिरसागर, शेतकरी
गृहिणींचे बजेट कोलमडले!
सर्वच प्रकारच्या खाद्यतेलांमध्ये दरवाढ झाली होती. अशात ग्राहकांकडून सोयाबीन तेलाला सर्वाधिक मागणी होत आहे. त्यामुळे गृहिणींचे बजेटही कोलमडले; परंतु येत्या काही दिवसांमध्येही दरात आणखी घसरण होणार असल्याचे तेलविक्रेत्यांनी सांगितले.