लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : शहरातील प्लॉट खरेदी - विक्री घोट्याळ्याचा मुख्य सुत्रधार आणि गत महिनाभरापासुन फरारी असलेल्या निलंबित तलाठी राजेश चोपडे विरोधात अखेर महसुल प्रशासनाने बुधवारी तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या अनुषंगाने शहर पोलीसांनी चोपडे विरोधात भा.दं.वि. कलम ४०९,४२०,४६८,४७१ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. परिणामी चोपडेच्या अडचणित आणखी वाढ होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. _खामगाव मंडळातील भाग १ चा तलाठी राजेश चोपडे याने शासकीय दस्तवेजात खाडाखोड, छेडछाड तसेच पाने फाडून मोठया प्रमाणात प्लॉट खरेदी विक्रीचा घोटाळा केल्याचे बिंग काही दिवसांपुर्वीच फुटले. फसवणुक झालेल्या नागरिकांच्या तक्रारीवरुन तलाठी चोपडे विरोधात यापुर्वीच शहर पोलीसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. त्यानंतर जिल्हाधिकारी यांच्या आदेशावरुन नेमण्यात आलेल्या ९ सदस्यीय चौकशी समितीच्या अहवालात गंभिर आक्षेप आढळून आले. नागरिकांची फसवणुक झाली. शासकीय दस्तवेजाची खाडाखोड करण्यात आल्याचे उघडकीस आले. त्यामुळे उपविभागीय अधिकारी मुकेश चव्हाण, तहसिलदार डॉ. शितल रसाळ यांनी प्राधिकृत अधिकारी म्हणुन मंडळ अधिकारी सुर्यकांत सातपुते यांची महसुल प्रशासनाच्या वतीने नेमणुक करण्यात आली. ९ सदस्यीय समितीचा अहवाल प्राप्त होताच बुधवारी मंडळ अधिकारी सातपुते यांनी शहर पोलीसांना तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या अनुषंगाने शहर पोलीसांनी तलाठी राजेश चोपडे विरोधात भा.दं.वि. कलम ४०९,४२०,४६८,४७१ अन्वये गुन्हा दाखल केला. या तक्रारीमुळे खामगाव शहर एकच खळबळ उडाली आहे. तलाठी चोपडे अद्यापही फरारीच !तलाठी चोपडे विरोधात गत महिना भरापुर्वी फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला तेव्हापासुन चोपडे हा फरार आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठाने चोपडे ची जामीन याचिका फेटाळून लावली आहे. तरीदेखील चोपडे पोलीसांच्या नजरेत धुळ फेकुन फरार असल्याचे दिसून येते. ९४ जणांची फसवणुक !जुन २०१५ ते मे २०१९ या कालावधीत संगणकिय ७/१२ अद्ययावत करतांना तलाठी चोपडे याने शासकीय दस्तवेजात खाडाखोड, व्हाईटनर लावणे, मुळ दस्तवेज फाडून फेकणे, रद्द झालेले फेरफार पुन्हा तयार करणे यांसारख्या प्रकाराचा वापर करुन प्लॉटचे मालक बदलविले. हे प्लॉट दुस?्यांना विकुन ९४ जणांची फसवणुक केल्याचे मंडळ अधिकारी सातपुते यांनी तक्रारीत नमुद केले आहे.
तलाठी चोपडे याच्या विरोधात महसुल प्रशासनाकडून शासकीय दस्तवेजात छेडछाड करण्यात आल्याची तक्रार प्राप्त झाली आहे. या तक्रारीच्या अनुषंगाने फरारी तलाठी चोपडे विरोधात नव्याने फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस त्याचा कसुन शोध घेत आहेत. - सुनिल अंबुलकर, निरिक्षक शहर पोलीस स्टेशन खामगाव
निलंबित तलाठी चोपडे याने अक्षम्य चुका केल्याचे समोर येत आहे. चौकशी समितीच्या अहवालातही चोपडेने गंभिर गुन्हे केल्याचे उघडकिस आले. त्यामुळे चोपडे विरोधात तक्रार देण्यासाठी मंडळ अधिकारी सातपुते यांना प्राधिकृत करण्यात आले. सातपूतेंनी दिलेल्या तक्रारीवरुन पोलीसांनी चोपडे विरोधात गुन्हे दाखल केले आहेत. - मुकेश चव्हाण, उपविभागीय अधिकारी, खामगाव