लोकमत न्यूज नेटवर्कचिखली: बनावट अकृषक आदेशप्रकरणी चिखली पोलिसांनी आता चांगलाच वेग घेतला असून, उपविभागीय अधिकारी बुलडाणा यांच्या कार्यालयातील तत्कालीन स्टेनो विजय गोविंदराव जाधव व त्याचा खासगी एजंट सचिन ऊर्फ पप्पू दिनकरराव देशमुख या दोघांना २४ जून रोजी पहाटे २ वाजेदरम्यान ताब्यात घेतले आहे. दरम्यान, या दोघांना मेहकर न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने २८ जूनपर्यंत पोलीस कोठडी ठोठावली आहे.उपविभागीय अधिकारी बुलडाणा या महसूल न्यायालयाचे बनावट स्वाक्षरी व शिक्यानिशी अकृषक आदेश तयार केल्याप्रकरणी चिखलीतील भूखंडधारकांसह तत्कालीन नायब तहसीलदार डब्ल्यू.एस. मोर, मंडळ अधिकारी अशोक वाळके व तलाठी रियाज शेख असे एकूण १६ जणांवर महसूल विभागाने मोठी कारवाई करून फौजदारी गुन्हे दाखल करण्याची कारवाई ८ आॅक्टोबर २०१६ रोजी झालेली आहे. तत्कालीन उपविभागीय अधिकारी बाळासाहेब तिडके यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आतापर्यंत १९ जणांविरुद्ध गुन्हे दाखल झालेले आहेत. त्यामध्ये आता उपरोक्त दोहोंची भर पडली आहे. या प्रकरणात २४ जून रोजी अटक झालेल्या विजय गोविंदराव जाधव हा उपविभागीय कार्यालय बुलडाणा येथे स्टेनो या पदावर काम करीत असताना त्याने या प्रकरणातील १६ भूखंडधारकांना जमीन अकृषक करण्यासाठी शासनाला भरावयाच्या महसुली चलानवर स्वाक्षऱ्या केलेल्या असल्याचे पुष्टीदायक पुरावा मिळून आला आहे. तर या कामी जाधव याचा खासगी एजंट सचिन ऊर्फ पप्पू दिनकरराव देशमुख याने मदत केल्याचे देखील निष्पन्न झाल्याने पुढील तपास कामासाठी चिखली पोलिसांनी २४ जूनला भल्या पहाटे २ वाजता दोघांनाही अटक केली असल्याचे तपास अधिकारी एपीआय विक्रांत पाटील यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.दरम्यान, या दोघांना मेहकर न्यायालयात उभे केले असता न्यायालयाने त्यांना २८ जूनपर्यंत पोलीस कोठडी ठोठावली आहे.
एसडीओ कार्यालयातील तत्कालीन स्टेनोसह एजंटला अटक
By admin | Published: June 25, 2017 9:18 AM