चिखली (जि. बुलडाणा): स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विष्णू पाटील कुळसुंदर यांनी बुलडाणा शहर पोलीस स्टेशनला दिलेल्या लेखी फिर्यादीवरून महाराजा अग्रसेन खासगी कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रो.प्रा. अशोक अग्रवाल यांच्यावर विविध कलमान्वये फसवणूक व बनावटीकरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशोक अग्रवाल यांनी त्यांच्या खासगी बाजार स्थापन करण्याचा अर्ज व प्रस्तावासोबत दिलेल्या कागदपत्रांमध्ये छेडखानी व खाडाखोड करून मूळ कागदपत्राचा आशय बदलून जिल्हा उपनिबंधक कार्यालयाची दिशाभूल केली. तसेच शासनाची दिशाभूल करून सदर बनावट दस्ताच्या आधारे खासगी बाजाराचा परवाना प्राप्त केला. तसेच दस्तऐवजांचे बनावटीकरण करणे, बनावट दस्त खरा म्हणून वापरणे, खोटे प्रतिज्ञापत्र सादर करून फसवणूक करून खासगी बाजाराचा परवाना मिळविला असल्याचा आरोप विष्णू पाटील कुळसुंदर यांनी केला असून, अशोक अग्रवाल यांनी महाराजा अग्रसेन खासगी कृषी उत्पन्न बाजार समिती स्थापन करण्यासाठी दिलेल्या अर्ज व प्रस्तावामध्ये भूखंड क्र.बी.१/१ या भूखंडाचा करारनामा दस्त क्र.२८७३/२0१0 जोडला होता. यामध्ये क्षेत्रफळासमोर १४४५५ चौ.मी.ऐवजी १५४५५ चौ.मी.असे हाताने खाडाखोड करून भूखंडाचे क्षेत्रफळ जास्तीचे दर्शवून हा परवाना प्राप्त केला आहे व खोटे प्रतिज्ञापत्र सादर करून शासनाची फसवणूक केली असल्याचे विष्णू पाटील यांनी फिर्यादीत नमूद केले आहे. या तक्रारीवरून अशोक अग्रवाल यांच्यावर गुन्हा क्र.१५८/२0१६ अन्वये भादंवि १८६0 चे कलम १९३, १९९, २00, ४२0, ४६३, ४६४, ४६८ व ४७१ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पो.नि. संग्राम पाटील करीत आहेत.
अग्रवालविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा
By admin | Published: May 03, 2016 2:07 AM