बुलडाणा: शहराजवळच असलेल्या पारखेड (एमआयडीसी) गावाच्या स्मशानभूमीत शनिवारी मध्यरात्री अज्ञातांनी अघोरी पूजा केल्याचा प्रकार रविवारी सकाळी उघडकीस आला. गावातील महिलांच्या निदर्शनास हा प्रकार आल्याने खळबळ उडाली. गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यातच सुशोभीकरण केलेल्या स्मशानभूमीत महिला शौचास जात असल्याने कोणीतरी खोडसाळपणा केल्याची चर्चाही गावात होत आहे.खामगाव तालुक्यात असलेल्या पारखेड गावातील स्मशानभूमीत हा प्रकार झाल्याचे महिलांना दिसून आले. अज्ञातांनी ही अघोरी पूजा केल्याने गावात भीतीचे वातावरण तयार झाले आहे. गावालगत असलेल्या स्मशानभूमीत वेगवेगळ्या ठिकाणी लिंबू ठेवण्यात आले. त्यामध्ये सुया टोचलेल्या आहेत. याशिवाय ळिंबाच्या भोवती रांगोळी, तांदळाचे गोल रिंगण करण्यात आले. काही धागेसुद्धा ठेवले आहेत. स्मशानभूमीत सर्वत्र २१ लिंबाभोवती रिंगण करण्यात आल्याचे ग्रामस्थांच्या निदर्शनास आले. हा काळ्या जादूचा किंवा गुप्तधनाचा प्रकार असल्याचा काहींचे म्हणणे आहे, तर काहींनी गुप्तधनासाठी बळी देण्याची प्रक्रिया असल्याचे म्हटले. ही पूजा कुणी केली, याबाबतची माहिती मिळाली नाही. याबाबत खामगाव ग्रामीण पोलीस ठाण्याचे बीट जमादार धांडे यांनी भेट देत पाहणी केली. तसेच ग्रामस्थांशी चर्चा केली.- संभाजी ब्रिगेडने केली स्वच्छतास्मशानभूमीत केलेला हा पूजेचा प्रकार खोडसाळपणा असून, त्यात काहीच तथ्य नाही, असे सांगत गावातील संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी स्मशानभूमीत पडलेले साहित्य गाेळा केले. तसेच स्वच्छता मोहीम राबविली. त्यामध्ये ब्रिगेडचे मुंडे व त्यांचे सहकारी सरपंच पती हिंमत सरदार सहभागी झाले.
स्मशानभूमीत घडलेल्या प्रकारानंतर सुज्ञ ग्रामस्थांनी स्वच्छता मोहीम राबविली आहे. अफवा किंवा अंधश्रद्धेवर विश्वास न ठेवता ग्रामस्थांनी आपली दैनंदिन कामे सुरू ठेवली आहेत. तसेच घटनेचा कोणताही परिणाम ग्रामस्थांवर झालेला नाही. - संगीता हिंमत सरदार, सरपंच, पारखेड