बुलढाणा: गेल्या १७ ते १८ अठरा वर्षापासून ग्रामीण भागात आरोग्य सेवा देणाऱ्या एनआरएचएम आरोग्य सेविकांना सबळ कारण नसतांना सेवेतून कमी केले जात आहे. १९ आरोग्य सेविकांना सेवा समाप्तीचा आदेश मिळाला आहे. येत्या काही दिवसात १३० सेविकांना सेवेतून कमी केले जाणार असल्याने एनआरएचएम आरोग्य सेविकांनी गुरूवारी जिल्हा परिषदसमोर ठिय्या आंदोलन केले.
यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते यांना निवेदन देण्यात आले आहे. ज्या कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता दाखविला आहे, अश्या १९ आरोग्य सेविकांना तात्काळ सेवेत घेण्यात यावे, व इतर राज्यात जसे एनआरएचएम कर्मचारी कायम करण्यात आले त्या धर्तीवर महाराष्ट्रातही निर्णय घ्यावा, आदी मागण्या करण्यात आल्या. ग्रामीण भागातील जनतेला तत्पर आरोग्य सुविधा मिळाव्या यासाठी २००६ मध्ये राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान सुरू झाले. या अंतर्गत आरोग्य सेविकांची एएनएमची भरती करण्यात आली.
या आरोग्य सेविकांनी ग्रामीण भागात जाऊन दखलपात्र काम केले आहे. अतिशय कमी पगारावर त्यांनी उत्कृष्ट सेवा दिली आहे. माता, बाल आरोग्य, गाव पातळीवर डिलेव्हरी करून शासनाच्या योजनांना तळागाळात पोहचविले. कोरोना काळातही रुग्ण तपासणी व उपचारासाठी याच आरोग्यसेविका पुढे होत्या. मात्र कंत्राटी असल्याकारणाने त्यांना सेवेतून कमी करण्याचा सपाटा शासनाने लावला आहे. त्यामुळे विविध मागण्यांसाठी जिल्ह्यातील आरोग्य सेविकांनी जिल्हा परिषदसमोर ठिय्या आंदोलन केले.
त्या आरोग्य सेविकांच्या सेवा समाप्तीचा निषेधसेवा जेष्ठता व ग्रामीण भागातील डिलिव्हरी असा निकष लावून जिल्ह्यात १९ आरोग्य सेविकांना घरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. याचा निषेध करीत जिल्ह्यातील आरोग्य सेविकांनी जिल्हा परिषदेचे पुढे जमून ठिया व निषेध आंदोलन केले. यावेळी महिला आरोग्य कर्मचाऱ्यांची उपस्थिती लाभली.