अनिल गवई, लोकमत न्यूज नेटवर्क, खामगाव: आदिवासी कोळी समाज बांधवांच्या विविध मागण्यांकडे शासन, प्रशासन आणि लोकप्रतिनिधींकडून सातत्याने दुर्लक्ष करण्यात येत आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या आदिवासी कोळी बांधवांनी शनिवारी बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयामोर अर्धनग्न आंदोलन करून प्रशासनाचे लक्ष वेधले. यावेळी तीव्र निदर्शनेही करण्यात आली.
जिल्हाधिकार्यांना सादर करण्यात आलेल्या निवेदनानुसार आदिवासी कोळी महादेव जमातीला अनुसुचित जमातीचे प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्र देण्याच्या प्रमुख मागणीसाठी २१ डिसेंबर रोजी जिल्हाधिकार्यांमार्पत अमरावती विभागीय आयुक्तांना निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनावर कोणत्याच प्रकारची दखल घेण्यात आली नाही. तसेच बेरार प्रांतातील पाल पारधी, राज पारधी, गाव पारधी, हरण शिकार पारधी या जातीचा विमुक्ती जाती अ मध्ये येतात. मात्र, नाम साध्यर्माचा लाभ घेऊन त्यांनी अनुसुचित जमातीचे प्रमाणपत्र मिळविले आहे. उपरोक्त जातीचे प्रमाणपत्र रद्द करण्यात यावे. तसेच आदिवासी कोळी जमातीला अनुसुचित जमातीचे प्रमाणपत्र व वैधता प्रमाणपत्र देण्याच्या मागणीसाठी गणेश पांडुरंग इंगळे, गजानन धाडे, संदीप सपकाळ यांनी मंगळवारपासून बेमुदत उपोषणास सुरूवात केली होती. त्यानंतरही बेमुदत उपोषण बेदखल करण्यात आल्याने संतप्त आदिवासी कोळी समाज बांधवांनी शनिवारी अर्धनग्न आंदोलन केले.