लोकमत न्यूज नेटवर्कचिखली : आ.बोंद्रे यांच्या नेतृत्वात डीएमओ कार्यालयात झालेली तोडफोड व त्यानंतर १६ मे रोजी काँग्रेसने घेतलेला आक्रमक पावित्र्याचा धसका घेत प्रशासनाने तातडीने उपाययोजना करून तूर खरेदीचा वेग वाढविला आहे. त्यानुषंगाने चिखली येथील खरेदी केंद्रावर तातडीने ५ काटे वाढविण्यात आले असून, अतिरिक्त तीन अधिकाऱ्यांची नेमणूकदेखील केली आहे. यामध्ये पुणे जिल्हा मार्केटींग अधिकाऱ्यांचीदेखील नियुक्ती येथे करण्यात आली असून बी.बी.वाडीकर, एम.डी.कापरे या अधिकाऱ्यांसह अपर जिल्हाधिकारी शिवानंद टाकसाळे हे आज दिवसभर चिखली येथील खरेदी केंद्रावर उपस्थित होते. याशिवाय संग्रामपूर व मेहकर येथील खरेदी केंद्रावरही प्रत्येकी २ काटे वाढविण्यात आले आहे. तर संग्रामपूर व मोताळा-पिंपळगाव देवी येथील खरेदी १७ मे रोजी पूर्ण होणार आहे. तसेच ज्या केंद्रावर मोजणी संपली आहे अशा खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांनी घरच्या तुरीची नोंदणी करण्याचे आवाहन करून त्या तुरीचीही मोजणी करण्यात येणार आहे. यापूर्वी बुलडाणा येथे ४ हजार तर खामगाव १ हजार क्विंटल तुरीची नोंदणी झाली आहे. नव्याने नोंदणी होणाऱ्या या सर्व तूर १५ दिवसांच्या आत मोजून घेण्याचे आश्वासन जिल्हाधिऱ्यांनी दिले आहे. दरम्यान, जळगाव जामोद येथील तूर मोजणी दोन दिवसांत पूर्ण होणार असून, चिखली व मेहकर येथील खरेदी केंद्रांवर अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांची नेमणूक प्रशासनाने केली आहे. तसेच सर्व केंद्रांवर भेटी देऊन मोजणीवर लक्ष ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
आंदोलनाच्या धसक्याने तूर खरेदीला वेग
By admin | Published: May 17, 2017 12:55 AM