नीलेश जोशी, पिंपळगाव सराई (जि. बुलढाणा): सियाचीन येथे कर्तव्यावर असताना वीरमरण आलेल्या अग्निवीर अक्षय लक्ष्मण गवते यांच्या पार्थिवावर त्यांच्या मूळ गावी शेतात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. कर्तव्यावर असताना वीरमरण आलेले ते महाराष्ट्रातील पहिलेच अग्निवीर होत.
जम्मू कश्मीर, दिल्ली, अैारंगाबाद मार्गे अग्निवीर अक्षय लक्ष्मण गवते (२३) यांचे पार्थिव २३ ऑक्टोबरला सकाळी १०:५० वाजता पिंपळगाव सराई येथे पोहोचले. यावेळी वीर जवान अक्षय गवते अमर रहे च्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. दरम्यान लक्ष्मण गवते यांच्या शेतात अक्षय लक्ष्मण गवते यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी नागपूर येथून आलेल्या १ जेसीओ आणि ८ जवानांनी हवेत बंदुकीच्या पाच फेरी मारून तर पोलिस दलाच्या जवानांनीही बंदुकीच्या पाच फैरी मारून वीर जवान अक्षय गवते यांना अभिवादन केले.
प्रारंभी वीर जवान अक्षय गवते यांचे पार्थिव फुलांची सजविलेल्या रथातून शोभायात्रा काढत गावात आणण्यात आले होते. यावेळी मोठ्या संख्येने परिसरातील नागरिक, महिला, तरुण यात सहभागी झाले होते. ग्रामस्थांनी यावेळी फुलांचा वर्षावर त्यावर केला. औरंगाबाद येथील सैनिक अधिकारी यांनी अक्षय गवते यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण केले. जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाचे विष्णू उबरहंडे यावेळी खासदार प्रतापराव जाधव, आ. श्वेता महाले, धिरज लिंगाडे, संजय गायकवाड, माजी आमदार राहुल बोंद्रे, हर्षवर्धन सपकाळ, रेखाताई खेडेकर विजयराज शिंदे, ॲड. जयश्रीताई शेळके, सुरेश आप्पा कबुतरे, संदीप शेळके, स्वाभिमानीचे रविकांत तुपकर,अप्पर पोलिस अधीक्षक बी.बी. महामुनी, एसडीपीओ गुलाबराव वाघ, ठाणेदार दुर्गेश राजपूत, नायब तहसीलदार अमरसिंग पवार, अजीम नवाज राही तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.
तिरंगा ध्वज कुटुंबीयांच्या स्वाधीन
यावेळी तोफखाना रेजिमेंटचे ले. कर्नल विवेक जोशी यांनी तिरंगा ध्वज वीरमरण प्राप्त झालेल्या अग्निवीर अक्षय गवते यांच्या कुटुंबीयांच्या स्वाधीन केला. वीर जवान अक्षय गवते अमर रहे अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. २० ऑक्टोबर रोजी वीर जवान अक्षय लक्ष्मण गवते यांचा सियाचीन येथे कर्तव्यावर असताना मृत्यू झाला होता.