लोकमत न्यूज नेटवर्कचिखली: कृषी कृषी विभागाचा सुधारित आकृतिबंध तयार करण्यासह विविध मागण्यांसाठी कृषी सहायक संघटनेच्या नेतृत्वाखाली कृषी सहायकांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. कृषी सहायकांकडून सात टप्प्यात आंदोलन केले जाणार असल्याचे संघटनेतर्फे कळविण्यात आले असून, याअंतर्गत येथील कृषी सहायकांनी १२ व १३ जून रोजी काळ्या फिती लावून कामकाज केले.राज्य शासनाने मृद व जलसंधारण असे दोन स्वतंत्र विभाग स्थापन केले आहे; मात्र कृषी विभागाचा सुधारित आकृतिबंधाबाबत अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. तसेच पदे वर्ग करण्याला कृषी सहायकांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. त्यानुसार संघटनेच्या नेतृत्वाखाली कृषी सहायकांनी सात टप्प्यात आंदोलन करण्याचे ठरविले असून, आज पहिल्या टप्प्यात तहसीलदार चिखली व तालुका कृषी अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येऊन काळी फीत लावून निषेध व्यक्त करण्यात आला. दरम्यान, कृषी विभागाचा सुधारित आकृतिबंध तातडीने तयार करावा, कृषी सहायकांमधून कृषी पर्यवेक्षकांची पदे १०० टक्के पदोन्नतीने भरण्यात यावी, कृषी सेवक पदाचा तीन वर्षांचा कालावधी शिक्षण सेवकांप्रमाणे आश्वासित प्रगती योजना व इतर सर्व लाभांसाठी ग्राह्य धरावा, आंतरसंभागीय बदल्या नियमित व्हाव्या, या मागण्यांचे निवेदन यावेळी संघटनेतर्फे देण्यात आले असून, या मागण्यांसाठी कृषी सहायकांनी आंदोलनाचे सात टप्पे केले आहेत. यामध्ये १२ ते १४ जून काळ्या फिती लावून कामकाज करणे, १५ ते १७ जून लेखणी बंद आंदोलन, १९ जून रोजी जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाजवळ धरणे, २१ ते २३ जून जिल्हाधिकारी कार्यालयावर साखळी उपोषण, २७ जून रोजी विभागीय कृषी सह संचालक कार्यालयावर धरणे, १ जुलै रोजी पुणे आयुक्तालयावर मोर्चा व निदर्शने आणि १० जुलैपासून बेमुदत काम बंद आंदोलन केले जाणार आहे.
सुधारित आकृतिबंधासाठी कृषी सहायकांचे आंदोलन
By admin | Published: June 14, 2017 1:47 AM