खामगाव : कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचा वाहनांचा ताफा अकोल्याहून बुलडाण्याला अचानक थांबला तो एका कापूस उत्पादकाच्या शिवारात. सदाभाऊंनी शिवारात जाऊन शेतकऱ्याकडे खरिपाची तयारी आणि इतर नियोजनाची आस्थेने माहिती घेतली आणि शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करण्याचे अधिकाऱ्यांना निर्देश दिले. राज्यातील कृषी विभागाचा खरीप पूर्व आढावा घेत कृषी राज्यमंत्री खोत विदर्भ व मराठवाड्याचा दौरा करत आहेत. 'शिपाई ते मंत्री चला शेताच्या बांधावर' अभियान त्यांनी सुरू केले आहे. त्याचा अनौपचारिक प्रारंभ बुलडाण्यात असा अचानक झाला. अकोल्याची विभागीय आढावा बैठक संपवून बुलडाण्याच्या दिशेने जाताना कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत अचानक बंथा ता.खामगाव या ठिकाणी थांबले व तेथील शेतकरी संजय खुनगे यांच्या कापसाच्या शेताला भेट दिली. खुनगे यांनी कोणते पिक लावलंय? कोणत्या जातीचं लावलंय? त्यावर रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास कोणती उपाययोजना करणार आहेत, आदी प्रश्न त्यांनी विचारले. शेतकऱ्याच्या अडचणीही समजून घेतल्या. खुनगे यांच्या शेताची पूर्ण माहिती त्यांनी घेतली. 'शिपाई ते मंत्री चला शेतकऱ्यांच्या बांधावर' या अभियानाची सुरुवात त्यांनी स्वतःपासूनच केली.राज्यातील कृषी खात्याच्या प्रत्येक घटकाने खरीप हंगामात शेतकऱ्यांना मदत व मार्गदर्शन सल्ल्यासाठी उपलब्ध असले पाहिजे. कार्यालयात बसून नियोजन न करता प्रत्यक्ष शेतात जाऊन शेतकऱ्यांच्या मदतीला सज्ज रहा, असे निर्देश खोत यांनी दिले.
सदाभाऊ शेतात आल्याने हुरूप वाढला
सदाभाऊंचे नाव ऐकून होतो पण ते अचानक आपल्या शिवारात येतील, असे कधी मनातही आले नव्हते. पण त्यांच्या भेटीने माझा हुरुप वाढला, असे संजय खुनगे यांनी सांगितले.