पंचायत समितीच्या सभागृहात १ जुलै रोजी पार पडलेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पं.स. सभापती सिंधू तायडे होत्या. तर उपसभापती शमशाद पटेल यांची प्रमुख उपस्थिती होती. सर्वप्रथम स्व. वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी पीक स्पर्धा विजेते रब्बी हंगाम सन २०२०-२१ अंतर्गत हरभरा पिकाकरिता तालुक्यातून सहभाग नोंदविलेल्या १३ शेतकऱ्यांमधून मंगरूळ नवघरे येथील विजय अंभोरे यांचा जिल्हास्तरावर सर्वाधिक उत्पन्न घेणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये तृतीय क्रमांक आल्याची माहिती देण्यात आली. तर तालुकास्तरावर प्रथम विजेते विजय भुतेकर सवना, द्वितीय विजेते गजानन सोळंकी कोलारा, तृतीय विजेते राजू सोळंकी कोलारा यांचा सत्कार शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व प्रमाणपत्र देऊन सभापती व उपसभापतींच्या हस्ते करण्यात आला. प्रथम विजेत्यांना अनुक्रमे ५ हजार, ३ हजार व २ हजार प्रमाणे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांचे पारितोषक शासनामार्फत मिळणार आहेत. प्रास्ताविक तालुका कृषी अधिकारी अमोल शिंदे यांनी केले. कृषी विभागामार्फत २१ जून ते १ जुलै दरम्यान कृषी संजीवनी सप्ताह राबविण्यात आला. याअंतर्गत राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमाबद्दल शिंदे यांनी यावेळी माहिती दिली. पीक स्पर्धा विजेते विजय भुतेकर यांनी मनोगत व्यक्त केले. यवेळी पं.स. कृषी अधिकारी संदीप सोनुने, कृषी विभागाचे अधिकारी कर्मचारी, पीक स्पर्धा विजेते शेतकरी व शेतकरी उपस्थित होते.
उपक्रमात विविध विषयावर मार्गदर्शन
तालुक्यात कृषी संजीवनी सप्ताहादरम्यान विविध कार्यक्रम राबविण्यात आले़ शेतकऱ्यांना विविध विषयावर मार्गदर्शन करण्यात आले़ या सप्ताहाचा १ जुलै राेजी समाराेप करण्यात आला़