चिखली : कृषी विभागाद्वारे यंदा कृषी संजीवनी सप्ताहादरम्यान बीबीएफ (रुंद सरी वरंबा) पद्धतीने पिकांची पेरणी करण्यासंदर्भाने शेतकऱ्यांमध्ये जनजागृती व मार्गदर्शन करण्यात आले होते. या पद्धतीने होणारा फायदा पाहता त्यास तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून या पद्धतीने पेरलेल्या पिकांची राज्याचे कृषी सचिव एकनाथ डवले यांनी शुक्रवारी (दि. १६) पाहणी करून समाधान व्यक्त केले.
कृषी सचिव एकनाथ डवले यांनी १६ जुलै रोजी तालुक्यातील मालगणी येथे भेट दिली. या भेटीदरम्यान बीबीएफ पद्धतीने पेरणी केलेल्या सोयाबीनची त्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. मालगणी येथील शेतकरी कैलास रिंढे व तेजराव रिंढे यांनी कृषी विभागाच्या मार्गदर्शनानुसार बीबीएफ पद्धतीने सोयाबीनची पेरणी केली आहे. दरम्यान, मालगणी गावामध्ये मागील वर्षी १७ एकरांवर, तर या वर्षी ४० एकरांवर बीबीएफ पद्धतीने पेरणी झाली आहे. याची दखल घेत डवले यांनी बीबीएफ तंत्रज्ञानाबाबत सखोल माहिती देण्यासह इतर शेतकऱ्यांनी या पद्धतीचा अवलंब करावा, असे आवाहन केले. तथापि मालगणी येथील शेतकऱ्यांनी या पद्धतीचा अवलंब केल्याबद्दल त्यांचे कौतुक केले. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नरेंद्र नाईक, उपविभागीय कृषी अधिकारी संतोष डाबरे, तालुका कृषी अधिकारी अमोल शिंदे, सरपंच प्रकाश चिंचोले, डॉ. वसंतराव चिंचोले, मनोहर घोलप, दिनेश लांबे, विजय चिंचोले, सुनील चिंचोले व शेतकरी उपस्थित होते.