- किशोर मापारीलोणार : जागतिक आश्चर्य असलेल्या लोणार सरोवराचे पाणी लालसर झाले असल्याचे निदर्शनास येत आहे. मात्र याचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे.
लोणार सरोवराच्या अभ्यासकांमध्येही याबाबत मतभिन्नता असल्याचे समोर येत आहे. मात्र हे पाणी लालसर झाल्यामुळे परिसरात हा विषय चर्चेचा ठरत आहे. महाराष्ट्रातील सर्वात छोटे पक्षी अभयारण्य म्हणूनही लोणार सरोवराची ओळख आहे. ग्लोबल वार्मिंग आणि पावसाच्या अनियमिततेमुळे येथील पर्यावरणात बरेच बदल झाल्याची चर्चाही सातत्याने असते. त्यात आता हे पाणी लाल झाल्यामुळे अधिक भर पडत आहे.
लोणार येथे अभ्यासासाठी येणाऱ्या परदेशातील तथा देशातील शास्त्रज्ञांना सहकार्य करण्यासोबतच त्यांना येथील सविस्तर माहिती पुरविण्याचे काम करणारे वैज्ञानिक मार्गदर्शक आनंद मिश्रा यांच्या म्हणण्यानुसार वातावरणातील झालेले बदल, वातावरणात निर्माण झालेला कोरडेपणा, सरोवर परिसरातील कमी झालेले पावसाचे प्रमाण यामुळे सरोवराचे पाणी कमी झाले आहे. अशा बदलातूनच हा प्रकार झाला असावा, असे मत त्यांनी व्यक्त केले. दरम्यान लोणार येथीलच प्रा.डॉ.सुरेश मापारी यांनी काही जलतज्ज्ञांशी याबाबत चर्चाही केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार हेलोबॅक्टेरिया आणि ड्युनोलिला सलीना नावाच्या कवकाची (बुरशी) खाऱ्या पाण्यात मोठी वाढ झाल्यामुळे कॅरोटेनॉईड नावाचा रंगयुक्त पदार्थ स्त्रवतो त्यामुळे पाण्याचा रंग लाल झाला असावा. असे तज्ञ सांगत असल्याचे ते म्हणाले. मात्र आताच या वाढीची क्रिया एवढया मोठ्या प्रमाणात का? हा प्रश्न अनुत्तरीत आहे. असे त्यांचे म्हणणे आहे.
नेमके कारण कोणते?
बॅक्टेरिया वाढल्यामुळे एका रात्री असा बदल होऊ शकत नाही त्यामुळे याचे नेमके कारण शोधणे गरजेचे झाले आहे. तीन अभ्यासकांना याबाबत विचारणा केली असता त्यांच्या मतांमध्ये भिन्नता आढळून आली.