मासरूळ : श्रीक्षेत्र अनवा येथील श्रीरुख्मिणी पांडुरंग संस्थानचे गुरुवर्य वै. तुकाराम महाराज चातुर्मास्ये यांचा प्रथम पुण्यतिथी महोत्सव व सद्गुरू वै. मैराळमहाराज चातुर्मास्ये यांच्या ३४ व्या पुण्यतिथीनिमित्त ७ जून ते दिनांक १३ जून २०२१ या कालावधीत अखंड हरिनाम संकीर्तन व ऑनलाईन प्रवचन सोहळ्याचे आयाेजन श्रीरुख्मिणी पांडुरंग संस्थानच्या वतीने करण्यात आले आहे़ हा साेहळा मोजक्या भाविकांच्या उपस्थितीत हाेणार आहे़ तसेच राज्यभरातील प्रसिद्ध महाराजांची प्रवचने फेसबुक, यूट्यूबवर थेट प्रक्षेपित करण्यात येणार आहेत.
सप्ताहादरम्यान रोज सकाळी १० ते १२ या कालावधीत श्रीगुरू ज्ञानेश्वर महाराज चातुर्मास्ये यांचे संतचरित्रावर प्रवचन, दुपारी ४ वाजता हरिपाठ, संध्याकाळी सात वाजता अभ्यागतांची प्रवचन सेवा व रात्री आठ वाजता परंपरेतील गुरुभक्तांची कीर्तनसेवा असे दैनंदिन कार्यक्रम राहणार आहेत़ या सोहळ्यात उल्हास महाराज सूर्यवंशी श्रीक्षेत्र आळंदी, डॉ. जयवंत महाराज बोधले श्रीक्षेत्र पंढरपूर, माधवदास महाराज राठी, डॉ. यशोधन महाराज साखरे- श्रीक्षेत्र आळंदी, देवाची, चैतन्यमहाराज देगलूरकर श्रीक्षेत्र पंढरपूर, चंद्रशेखरमहाराज देगलूरकर, आदी वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ व्यक्तींची ऑनलाईन प्रवचनसेवा होऊन १३ जून २०२१ रोजी श्रीसंस्थानचे पंधरावे पीठाधिश परमपूज्य गुरुवर्य श्री ज्ञानेश्वरमहाराज तथा माउलीमहाराज चातुर्मास्ये यांचे काल्याचे कीर्तन होईल़ या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्रीसंस्थानचे तथा ऑनलाईन कार्यक्रमाचे संयोजक राजमहाराज चातुर्मास्ये यांनी दिली.