बुलडाणा : मेळघाटमधून जाणाऱ्या अकोला-खंडवा या ब्रॉडगेज रेल्वे मार्गामुळे संवर्धित पर्यावरण व सामाजिक जीवनावर प्रतिकूल परिणाम होणार असून, शाश्वत विकासाची संकल्पना लक्षात घेता राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या उच्चस्तरीय समितीने सुचविलेल्या पर्यायी मार्गाचाच अवलंब करण्याबाबत राज्यपालांकडे पाठपुरावा करावा, अशी विनंती आ. हर्षवर्धन सपकाळ यांनी विदर्भातील सर्व आमदार व खासदारांना पत्राद्वारे केली आहे.काँग्रेसप्रणीत सरकारच्या काळात २००८ मध्ये मंजूर झालेल्या अकोला-खंडवा या ब्रॉडगेज रेल्वे मार्गासाठी मेळघाटऐवजी व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या उच्चस्तरीय समितीने २०१५ मध्ये सुचविलेल्या पर्यायी मार्गाचा विचार व्हावा, याबाबत पर्यावरणवादी व इतरांकडून सातत्याने मागणी करण्यात येत आहे. दरम्यान, १८ जून रोजी दिल्ली येथे झालेल्या बैठकीत या मागणीला केराची टोपली दाखवित प्रस्तावित मार्गानेच हा प्रकल्प पूर्ण करण्याचा निर्णय केंद्राच्या मंत्री गटाच्या समितीने घेतला आहे. यापूर्वीचे सर्व प्रयत्न निष्फळ ठरल्यामुळेच या निर्णयाविरोधात पर्यावरणवादी, सामाजिक कार्यकर्ते यांनी आॅनलाइन याचिका दाखल केली असून, नागपूर खंडपिठातसुद्धा जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे.त्यानुषंगाने आ. सपकाळ यांनी यापूर्वीच राज्यपालांना पत्र लिहून निर्णयाबाबत पुनर्विचार व केंद्र सरकारकडे पर्यायी मार्गाची शिफारस करण्याची विनंती केली आहे. त्यानंतर आता आ. हर्षवर्धन सपकाळ यांनी विदर्भातील सर्व विधानसभा सदस्य, विधान परिषद सदस्य व लोकसभा सदस्यांना २९ जून रोजी पत्र लिहिले आहे. त्यात मेळघाटमधून जाणाºया प्रस्तावित मार्गाऐवजी पर्यायी मार्ग व्यापक लोकहिताचा असल्याबाबत नमूद करून प्रस्तावित मेळघाट मार्ग हा पर्यावरण व सामाजिक जीवनावर प्रतिकूल परिणाम करणारा असल्याचे म्हटले आहे. तसेच ही जनभावना लक्षात घेता आपण सर्वांनी राज्यपाल, मुख्यमंत्री, केंद्रीय रेल्वे मंत्री व शासनाच्या मुख्य सचिवांना पत्र लिहून पर्यायी मार्गाचा अवलंब प्रकल्पासाठी व्हावा, अशी विनंती केली आहे.
दिल्लीतील बैठकीत प्रश्न मार्गी लावण्यासाठी शुभेच्छा : सपकाळमानव विकास निर्देशांकात माघारलेल्या बुलडाणा जिल्ह्यातील संग्रामपूर व जळगाव जामोद या तालुक्यांच्या सर्वंकष विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण म्हणून ठरू शकणाऱ्या अकोला-खंडवा या ब्रॉडगेज रेल्वेच्या पर्यायी मार्गासाठी जिल्ह्याचा नागरिक म्हणून आपण प्रयत्न करणार आहोत. त्यामध्ये श्रेयवादाचा कुठेच प्रश्न येत नाही. संबंधित परिसराचे लोकप्रतिनिधी हे या महिन्यात दिल्लीत होणाºया बैठकीत हा प्रश्न मार्गी लावणार असतील, तर निश्चित आनंद आहे. त्यासाठी आपल्या मनापासून त्यांना शुभेच्छा आहेत. दिल्लीतील बैठकीसाठी जर दोन्ही तालुक्यातील काही नागरिक उपस्थित राहू शकले, तर पारदर्शकतेच्या दृष्टीने ते अधिक उचित होईल, अशी पुस्तीही आ. सपकाळ यांनी या विषयासंदर्भात बोलताना जोडली. सत्ताधाºयांकडून मागणी पूर्ण न झाल्यास जनहितासाठी काँग्रेस पक्ष न्यायालयापासून रस्त्यावरील संघर्षापर्यंत तयार राहील, असे ही ते म्हणाले.