बुलडाणा: अकोला जिल्ह्यात कोरोनाने कहर केला आहे. त्यामुळे खामगाव तालुक्याची चिंता आणखी वाढली आहे. जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्याने जिल्हा प्रशासनाने कडक निर्बंध लागू केले असले तरी बाहेरील जिल्ह्यातून येणाऱ्या बसेस अजूनही सुरूच आहेत. त्यामुळे जिल्ह्याची चिंता आणखी वाढली आहे.
मागच्या दोन महिन्यापासून कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. मृतांची संख्याही वाढत आहे. जिल्ह्यात दर दहा तासाला एकाचा मृत्यू होत आहे. बुधवारी कोरोनामुळे ५ जणांचा मृत्यू झाला. शेजारच्या अकोला आणि जळगाव खानदेश या जिल्ह्यांत गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. पहिल्या लॉकडाऊनच्यावेळी परजिल्ह्यातून येणारी बस थेट बसस्थानकात येत होती. या ठिकाणी तपासणीही होत होती. मात्र आता बसस्थानकावर येण्याऐवजी शहरातील थांब्यावर या बसेस बिनधास्तपणे थांबत आहेत. यामधील प्रवासी चालक, वाहकांना विनंती करून शहराच्या थांब्यावर उतरत आहेत. त्यामुळे त्यांची अँटीजन आणि आरटीपीसीआर चाचणी करणे गरजेचे असताना या ठिकाणी कोणत्याही प्रकारची तपासणी करण्यात येत नाही. त्यामुळे जिल्ह्याची चिंता वाढल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.
बाहेरच्या प्रवाशांची तपासणी होणे आवश्यक
पर जिल्ह्यातून येणाया बसेसमधील प्रवाशांना शहरातील बस थांब्यावर न उतरविता बसस्थानकात आणून त्यांची अँटीजन आणि आरटीपीसीआर चाचणी करून घ्यायला पाहिजे. एसटी महामंडळाने जिल्हा प्रशासनाने घालून दिलेल्या नियमाचे पालन करणे आवश्यक आहे. तसेच विनाकारण बसस्थानकात येणाऱ्या प्रवाशाला दंड लावणे हेही तितकेच आवश्यक आहे तरच कोरोना संख्या कमी होईल. अन्यथा कोरोना वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. सध्या बिनधास्तपणे काही नागरिक रस्त्याने फिरताना दिसून येत आहेत.
रेल्वे, बस आणि ट्रॅव्हल्सने येत आहेत प्रवासी
एस.टी.बस
एस. टी. बसमध्ये दररोज ३० - ३५ प्रवासी हे बाहेरच्या जिल्ह्यांतून खामगाव शहरात येतात. काही प्रवासी थांब्यावरच उतरत आहेत. मोजकेच प्रवासी तपासणी करत आहेत.
ट्रॅव्हल्स
खामगावात खासगी बस सुरु आहेत. खामगाव राष्ट्रीय महामार्गावर असल्याने दररोज अनेक खासगी बस येतात. खामगावात दररोज अनेक खासगी बस येतात. यातून अनेक प्रवासीही खामगाव शहरात येतात. अशावेळेस अशा खासगी बसला आवर घालणे गरजेचे आहे. खासगी बस परजिल्ह्यातही जात आहेत.
रेल्वे
नांदुरा व शेगाव येथे रेल्वेने अनेक प्रवासी येतात. हे प्रवासी येथून खामगावात येतात. सध्या रेल्वेने येणारे प्रवासी कमी असले तरी नियमित प्रवाशांची ये- जा सुरू आहे.