अमडापूर: देवाची आळंदी (जि. पुणे) लगत असलेल्या कळेगाव येथील डॉक्टरला सोन्याचा हंडा देण्याच्या बहाण्याने बुलडाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील उंद्री येथे एका शेतात बोलावून एक जून रोजी त्याला बेदम मारहाण करून त्याच्याकडील रोख दहा लाख रुपये आणि दोन भ्रमणध्वनी असा एक लाख १४ हजार रुपयांचा मुद्देमाल घेवून फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे.दरम्यान, या प्रकरणी अमडापूर पोलिसांनी तिघांना अटक केली असून चार जण फरार असल्याची माहिती सुत्रांनी दिली. ठाणेदार सुनील आंबुलकर ह्यांनी दिलेल्या माहितीुसार पुणे जिल्ह्यातील कळेगाव येथील कैलास परशराम पवार (४८) असे फसवूक झालेल्या डॉक्टराचे नाव आहे. कळेगाव येथे त्यांच्या घरासमोर गेल्या सहा महिन्यापासून एक व्यक्ती गवंडी काम करत होता. त्याने विश्वासात घेऊन गावाकडे खोदकामादरम्यान एक सोन्याचा हंडा मिळाला आहे. परंतू आमच्याकडे आधारकार्ड, पॅनकार्ड नसल्याने आम्ही सोने विकू शकत नाही असे सांगून आपणास सोन्याचे एक खरे नाणे दिले. त्या नाण्याची तपासणी केली असता ते खरे निघाले. मात्र सोन्याचा हंडा आपण कळेगाव येथे आणू शकत नसल्याचे सांगून गवंडी काम करणाऱ्याने डॉक्टरला एक जून रोजी उंद्री येथील लाखनवाडा रोडवर असलेल्या एका शेतात बोलावले. सोबतच पैसे आणल्याची विचारणा करत डॉक्टर पवार यांच्याकडील दहा लाख रुपये व दोन मोबाईल असा एक लाख १४ हजार रुपयांचा मुद्देमाल संतोष जाधव (रा. दधम, ता. खामगाव) आणि चार जणांनी मारहाण करून हिसकावून घेतले. अशी तक्रार डॉ. पवार यांनी दिली आहे.त्यावरून पोलिसांनी संतोष जाधव व अन्य चार जणाविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल केला असून अवघ्या २४ तासात संतोष जाधव यास अटक केली आहे. दरम्यान, अन्य आरोपींचा सध्या पोलिस शोध असल्याचे ठाणेदार आंबुलकर यांनी सांगितले.
देवाच्या आळंदीतील डॉक्टरला दहा लाखांना ठगवले, एक अटक; चार फरार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 02, 2019 9:54 PM