चिखली(जि. बुलडाणा), दि. २0- गावात सर्रास होणारी गावठी व देशी दारूची अवैध विक्री, त्यामुळे लहान मुलांमध्ये बालपणापासूनच दारूची सवय लागणे, तर आनेकांचे संसार उद्ध्वस्त होण्याबरोबच घराघरामध्ये भांडण तंटे या सर्व बाबींमुळे त्रस्त येवता येथील सुमारे १३८ महिला २0 सप्टेंबर रोजी चिखली पोलीस स्टेशनवर धडकल्या. या ठिकाणी हिरकणी महिला उत्कर्ष प्रतिष्ठानच्या संस्थापक अध्यक्ष अँड. वृषाली बोंद्रे यांच्या नेतृत्वात दारूबंदीची मागणी करणारे निवेदन सादर करण्यात आले. हिरकणी महिला उत्कर्ष प्रतिष्ठानच्या दारूबंदी उपक्रमात आजवर अनेक गावे समाविष्ट झाली असून गावोगावच्या महिला दारूबंदीसाठी पुढकार घेत आहेत. यापूर्वी तालुक्यातील तेल्हारा, एकलारा, आंबाशी, गांगलगाव, माळशेंबा, सातगाव भुसारी, खंडाळा मकरध्वज या गावच्या महिलांनी दारूबंदीसाठी विवेदने दिली आहेत. याअंतर्गत २0 स प्टेंबर रोजी येवता येथील शेकडो महिला या मागणीसाठी अँड. वृषाली बोंद्रे यांच्याकडे निवेदन घेऊन आले असता त्यांनी महिलांची दखल घेत व त्यांचे नेतृत्व करीत महिलांसह चिखली पोलीस स्टेशन गाठले. येवता गावातील दारू विक्री बंद व्हावी यासाठी गावात अवैध व्यवसाय करणार्या लोकांची इत्थंभूत माहिती त्यांनी पोलीस स्टेशनला दिली.. या नंतरही गावातील अवैध दारू विक्री बंद झाली नाही तर पोलीस स्टेशन कार्यालयासमोर उ पोषण करावे लागेल, असा इशारा या निवेदनाद्वारे व प्रत्यक्ष चर्चेत महिलांनी दिला. दरम्यान, ठाणेदार महेंद्र देशमुख यांनी दारूबंदीसाठी संपूर्ण सहकार्य करण्यास पोलीस यंत्रणा तयार आहे. आम्ही तातडीने पावले उचलून अवैद्य दारूविक्रेत्यांना जेरबंद करू; परंतु काही काळ उलटला व विषय मागे पडल्यानंतर पुनश्च दारू विक्री सुरू होते, त्यामुळे कायमची दारूबंदी करण्यासाठी गावातील महिला नागरिकांनी आम्हाला सहकार्य करून वेळोवेळी माहिती पुरविल्यास सातत्याने कार्यवाही करून दारूविक्रीला आळा घातल्या जाऊ शकतो, तेव्हा पोलिसांना सहकार्य करा, असे आवाहन केले.
दारूबंदीसाठी महिलांचा एल्गार!
By admin | Published: September 21, 2016 2:27 AM