खामगाव (बुलडाणा): पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या येथे ७ ऑक्टोबर रोजी दुपारी २ वाजता होणार्या जाहीर सभेच्या अनुषंगाने प्रशासन कामाला लागले असून, आज वरिष्ठ अधिकार्यांनी सुरक्षेबाबत आढावा घेतला. सभास्थळ, हेलिकॉप्टर लॅन्डिंग स्थळ, सभेच्या आजूबाजूचा परिसर आदी ठिकाणी पाहणी करून सूचना देण्यात आल्या. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने खामगाव विधानसभा मतदारसंघाचे भाजपा व मित्र पक्षाचे उमेदवार अँड. आकाश पांडुरंग फुंडकर यांच्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जाहीर सभेचे आयोजन ७ ऑक्टोबर रोजी दुपारी २ वाजता येथील जलंब रस्त्यावरील शासकीय तंत्रनिकेतनच्या मैदानावर करण्यात आले आहे. यासाठी आज अमरावती विभागाचे विशेष पोलिस महानिरीक्षक बिपीन बिहारी, जिल्हाधिकारी किरण कुरुंदकर, जिल्हा पोलिस अधीक्षक श्यामराव दिघावकर, अतिरिक्त जिल्हा पोलिस अधीक्षक यशवंत सोळंके, दिल्ली येथून आलेले विशेष पोलिस दलाचे आयपीएस अधिकारी चव्हाण, उपविभागीय महसूल अधिकारी बाबासाहेब वाघमोडे, उपविभागीय पोलिस अधिकारी जी. श्रीधर, महावितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता अशोक म्हस्के, बीएसएनएलचे सावजी, तहसीलदार ए.एन. टेंभरे, मुख्याधिकारी नामवाड, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता पाचपांडे, शहर पोलिस स्टेशनचे ठाणेदार दिलीप पाटील, शिवाजीनगर ठाणेदार ओमप्रकाश अंबाडकर, अग्निशमन विभागाचे मोहन अहिर आदींनी पाहणी केली. या सभेसाठी भाजपानेही जय्यत तयारी केली असून, आज जिल्हाध्यक्षांनी पक्षाच्या विविध नेत्यांसोबत चर्चा करून नियोजन केले असल्याची माहिती सूत्रांनी दिली. या दरम्यान पंतप्रधानांच्या सभेसाठी प्रशासन तत्पर झाले असून, सर्व स्तरावर धावपळ सुरू झाल्याचे चित्र बुलडाण्यात होते.
पंतप्रधानांच्या सभेसाठी ‘अलर्ट’
By admin | Published: October 05, 2014 11:57 PM