लोकमत न्यूज नेटवर्कसिंदखेड राजा : खोदकामात सापडलेले दोन किलो सोने देतो असे सांगून इसारापोटी दिलेले आठ लाख रुपये घेऊन पलायन करणार्या चार आरोपींना सिंदखेड राजा पोलिसांनी अवघ्या ३० तासात अटक केली आहे. दरम्यान, यातील दोन आरोपींना न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे तर उर्वरित दोन आरोपींनी सिंदखेड राजा पोलिसांनी गुरूवारी रात्री आटक केली.वीस लाखात दोन किलो सोने देतो असे म्हणत २८ नोव्हेंबला एकास आठ लाख रुपयांनी लुटल्याची घटना सिंदखेड राजा शहरानजीक सावखेड तेजन फाट्यानजीक घडली होती. या प्रकरणी जालना जिल्ह्यातील जाफ्राबाद तालुक्यातील गोळेगाव येथील ३६ वर्षीय निवृत्ती प्रल्हाद शेळके यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यावरून पोलिसांनी लगोलग तपास करत अवघ्या दोन तासात दोन आरोपींना अटक केली होती. चांगेफळ येथील शिवशंकर सखाराम शिंदे, सुनील सखाराम चव्हाण (रा. देवखेड) यांचा यात समावेश होता. त्यांना न्यायालयाने दोन डिसेंबर पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. दरम्यान उर्वरित दोन आरोपी ज्ञानेश्वर भरत शिंदे (रा. खापरखटी खामगाव), अंकुश संपत भालेराव (खापरखुटी खामगाव) यांना पोलिस उपनिरीक्षक संतोष नेमणार, सहाय्यक पोलिस निरीक्षक शिवाजी सिंगनवाड, पोलिस कॉन्स्टेबल जितेंद्र जाधव, रमेश गोरे, गणेश काकड, योगेश रत्नपारखी, वैशाली कोरडे यांनी जेरबंद केले. घटनेचा पुढील तपास एसडीपीओ नलावडे आणि ठाणेदार बळीराम गिते यांच्या मार्गदर्शनाखआली संतोष नेमणार हे करीत आहेत.
अशी घडली घटनाबाजारात एक किलो सोन्याची किंमत ३० लाख होत असतांना दोन किलो सोने केवळ २० लाखात मिळते ही बाबच संशयाची असताना शिवशंकर सखाराम शिंदे यांनी गावातीलच व्यक्तीला कमी भावात सोने मिळवून देतो म्हणून मुरलीधर म्हस्के या व्यक्तीला मोहजाळ्यात ओढले. ऐवढेच नाही तर आरोपीतांनी सोनेही त्यांना दाखविले. त्यामुळे शिवशंकरवर विश्वास ठेवून मुरलीधर म्हस्के यांनी जावाई निवृत्ती उर्फ बंडू प्रल्हाद शेळके (रा.गोळेगाव ता.जाफ्राबाद, जि. जालना) यांचेशी संपर्क साधून उपरोक्त प्रकार सांगितला. निवृत्तीनेही सोन्याची खात्री करुन घेतली. चिखली येथील एका बँकेतून आठ लाख रुपये काढून ठरल्या ठिकाणी सावखेडतेजन फाट्याजवळील ते २८ नोव्हेंबरला जंगलात पोहचले. एकमेकाला पैसे आणि सोने दाखवित निवृत्ती शेळके यांनी ८ लाख रुपये शिवशंकर शिंदे यांच्याजवळ दिले. पैसे घेवून शिवशंकर हा झुडूपात गेला आणि सोबत्याजवळ पैसे देवून घटनास्थळावरुन बुधवारी तो फरार झाला. त्यानंतर निवृत्ती शेळके यांनी सिंदखेड राजा पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती.