- अझहर अली
संग्रामपूर (बुलडाणा) - गेल्या दोन दिवसापासून सूरू असलेल्या संततधार पावसाचा जोर कायम आहे. हनुमान सागर धरण पाणलोट क्षेत्रात पाण्याची आवक वाढल्याने सोमवारी सायंकाळी धरणाचे चार दरवाजे ५० से.मी ने उघडण्यात आले होते. रात्री सव्वा दहा वाजता उर्वरित दोन दरवाजे २५ से.मी. ने उघडण्यात आले आहे. त्यामुळे वान नदी पात्रात ६४.८५ घ मी/से विसर्ग वाढवून १२८.३० घ मी. से करण्यात आला आहे. अमरावती, अकोला, बुलडाणा या तीन जिल्ह्यांच्या सीमेवर बांधलेल्या वारी हनुमान येथील हनुमान सागर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात रविवारी ४७ मी मी पावसाची नोंद झाली.
सोमवारी सकाळपासून जोरदार पाऊस सुरू असल्याने धरणाच्या जलाशय पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. सध्या स्थिती धरणात ६५ टक्क्यांच्या वर जलसाठा उपलब्ध झाला असून पाणलोट क्षेत्रात पाण्याची मोठ्या प्रमाणात आवक सूरू आहे. वान प्रकल्पाच्या मंजूर जलाशय परिचालन सुची नुसार प्रकल्पामध्ये जुलै अखेरीस ६१.४४ टक्के जलसाठा असणे आवश्यक आहे. त्या पृष्ठभूमीवर धरणातून वान नदी पात्रात पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पाणलोट क्षेत्रात आजतागायत एकूण ४२५ मी मी पावसाची नोंद झाली आहे.
सध्या स्थिती धरणाची जलाशय पातळी समुद्रसपाटीपासून ४०४.९० मीटर आहे. पाण्याची आवक प्रचंड वाढत असल्याने धरणाचे सर्व सहा दरवाजे उघडण्यात आले. चार दरवाजे ५० से.मी ने तर उर्वरित दोन दरवाजे २५ से.मी. ने उघडण्यात आल्याने धरणातून वान नदीपात्रात १२८.३० घ मी. से पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने वान नदीला प्रचंड पूर आला आहे. विसर्ग वाढविणे अथवा कमी करण्याबाबतचा निर्णय पाण्याच्या आवक वर अवलंबून राहणार आहे. त्यामुळे वान नदीच्या काठावरील गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
जल वीज निर्मिती संच सुरू होण्याची दाट शक्यता.हनुमान सागर धरणावरील वीज निर्मिती संच दोन ते तीन दिवसात सुरू होण्याची शक्यता आहे. गत सोळा वर्षांपूर्वी उभारण्यात आलेल्या वीज निर्मिती संचाची क्षमता १ हजार ५०० किलो वॅट असून यावर १ हजार किलो वॅट वीज निर्मिती करण्यात येते. या संचाची क्षमता दररोज ३६ हजार युनिट आहे. यामधून दररोज २० ते २५ हजार युनिट जनरेट होतात. धरणाच्या पाणी पातळीप्रमाणे वीज निर्मिती करण्याचे काम सुरू होते. सद्यस्थिती धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस पडत असल्याने जलाशय पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे दोन ते तीन दिवसात हनुमान सागर धरणावरील जल वीज निर्मिती संचावरून १ हजार किलो वॅट वीज तयार होण्याची दाट शक्यता आहे. येथील वीज निर्मिती संचावरून अकोला जिल्ह्यातील हिवरखेड येथील उपकेंद्राला वीज पुरवठा करण्यात येतो.