- नीलेश जोशी
बुलडाणा: लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राज्यात होऊ घातलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसह अन्य पक्षांच्या महागठबंधनाच्या जागा वाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात आहे. राष्ट्रवादी काँग्रेससोबत काही जागा अदलाबदलासंदर्भात चर्चा सुरू असून बुलडाण्याच्या जागेबाबतही आम्ही आग्रही आहोत. मात्र उभय बाजूंनी टोकाची भूमिका घेतलेली नसून काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसमधील जागा वाटपात चर्चेतून मार्ग निघेल, असे काँग्रेसचे विधान सभेचे विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी बुलडाणा येथे स्पष्ट केले. दरम्यान, बहुजन वंचित आघाडीलाही आम्ही चार जागांचा प्रस्ताव दिलेला असून त्यांच्याच प्रतिसादाची वाट पाहत आहोत, असेही ते म्हणाले. पुलवामा येथील अतिरेकी हल्ल्यात शहीद झालेल्या बुलडाणा जिल्ह्यातील जवानांच्या अंत्यसंस्काराच्या कार्यक्रमासाठी ते जिल्ह्यात आले होते. त्यावेळी काही काळ बुलडाणा येथे थांबले होते. यावेळी काँग्रेसचे आमदार हर्षवर्धन सपकाळ, काँग्रेस जिल्हाध्यक्ष तथा आ. राहूल बोंद्रेही उपस्थित होते. त्यावेळी त्यांना याबाबत विचारणा केली असता त्यांनी ही बाब ‘लोकमत’शी बोलताना स्पष्ट केली. येत्या आठवड्यात महागठबंधनाच्या जागा वाटपांना अंतिम स्वरुप मिळेल. काँग्रेस-राष्ट्रवादीमधील जागा वाटप जवळपास अंतिम टप्प्यात असून तीन ते चार जागाच्या आदलाबदलाचा विषय आहे. त्यामध्ये बुलडाण्याच्या जागेसाठी काँग्रेस आग्रही आहे. आठवडा अखेर याबाबत निर्णय अपेक्षीत आहे. उभय बाजूंनी टोकाची भूमिका नसल्याने लवकरच जागा वाटपाला मुर्त स्वरुप मिळणार असल्याचे संकेत त्यांनी दिले. दरम्यान, स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे सर्वेसर्वा खा. राजू शेट्टी यांच्याशी प्रारंभी झालेल्या चर्चेनुसार हातकणगलेची जागा त्यांना दिलेली आहे. त्यांना आणखी दोन जागा हव्या आहेत. त्यानुषंगाने काँग्रेसच्या कोअर कमिटीमध्ये सध्या मंधन सुरू आहे. परंतू आपणास हा मुद्दा फारसा अडचणीचा वाटत नाही. मनसे सोबत आमची तशी काही चर्चा नाही. काही कामा निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार हे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना भेटले होते. मनसेला सोबत घ्याचे किंवा नाही हा राष्ट्रवादी पक्षाच्या स्तरावरील विषय आहे. काँग्रेसकडून तसा कुठलाही प्रस्ताव नाही किंबहुना आपणास त्याबाबत माहिती नाही, अशी पुष्टीही त्यांनी जोडली. दरम्यान, या आठवड्या अखरे आघाडीचे जागावाटप जवळपास पूर्णत्वास गेलेले असले. येत्या काळात केव्हाही निवणुकांची तारिख जाहीर होऊन आचार संहिता लागू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे उमेदवारही लवकरच निश्चित करून जाहीर करावे लागणार आहेत. त्यादृष्टीने आमची तयारी सुरू असल्याचेही ते म्हणाले.
वंचित बहुजन आघाडीच्या प्रतिसादाची प्रतीक्षा
वंचित बहुजन आघाडीशी जागा वाटपाबाबत चर्चा झाली आहे. त्यांना चार जागांचा प्रस्ताव आम्ही दिलेला आहे. आपल्या सहकार्यांशी बोलून अॅड. प्रकाश आंबेडकर त्याबात सांगणार आहेत. त्यांच्याच प्रतिसादाची आम्ही सध्या वाट पाहत आहोत. मध्यंतरी राज्यातील दहा जागांसाठी वचित बहुजन आघाडीने उमेदवार जाहीर केले होते. त्यापृष्ठभूमीवर विचारणा केली असता विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी ही बाब स्पष्ट केली. काँग्रेसकडून तसा प्रस्ताव नसल्याचे अॅड. प्रकाश आंबेडकर म्हणत असतील तर ते तसे नाही. वस्तुस्थिती तशी नाही. आम्ही चार जागांचा प्रस्ताव त्यांना दिलेला आहे, असे विखेपाटील यांनी अधोरेखीत केले. त्यांनी दिलेल्या प्रस्तावाच्या अनुषंगाने आम्ही हा प्रस्ताव दिला असल्याचेही ते शेवटी म्हणाले. जागा बदलाबाबत आग्रह; टोकाची भूमिका नाही सध्या राष्ट्रवादीच्या कोट्यात असलेली बुलडाणा लोकसभेच्या जागेसह अन्य तीन ते चार जागा अदलाबदलावर चर्चा सुरू आहे. बुलडाण्याच्या जागेसाठीही आम्ही आग्रही आहोत. चर्चेतून मार्ग निघणार आहे. मात्र उभय बाजूंनी टोकाची भूमिका नाही, असे ही विखे पाटील यांंनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.