मेहकर : शहर व तालुक्यातील लघुव्यावसायिक मंडपवाले, डीजे, बँड, घोडेवाले, आचारी, मजूर यांना त्यांचा व्यवसाय करण्याची शासनाने परवानगी द्यावी; अन्यथा त्यांना व्यवसायाची नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी भीमशक्तीचे राज्य सरचिटणीस भाई कैलास सुखधाने यांनी उपविभागीय अधिकारी मेहकर यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.
सध्या लग्न सराईचे दिवस असल्याने सदर व्यावसायिकांनी कधी बँकेकडून तर कधी खाजगी सावकाराकडून अव्वाच्या सव्वा व्याजदराने कर्ज घेऊन मंडप, ढोलताशे, स्पीकर आदी नवीन साहित्य खरेदी केले आहे. मात्र हंगामाच्या सुरुवातीलाच शासनाने लाॅकडाऊन घोषित केले आहे. हंगामावर कर्जाची परतफेड करण्याच्या अटीला त्यामुळे हरताळ फासला गेला आहे. लघुव्यावसायिकांच्या कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे. शासनाने इतर उद्योग व व्यावसायिकांना ज्या पद्धतीने मदतीचा हात दिला तशीच मदत अनुदान तत्त्वावर या व्यावसायिकांना देण्यात यावी, अशी मागणीदेखील निवेदनात करण्यात आली आहे. निवेदनावर भीमशक्तीचे राज्य सरचिटणीस भाई कैलास सुखधाने, पश्चिम विदर्भ सरचिटणीस किशोर गवई, संजय वानखेडे, रवी पवार, मुन्ना शेख जमा, शे रफीक शे बनेसहाब, असद भाई शे युसुफ कुरेशी, प्रशांत जुबडे, सुभाष गवई, समाधान अवसरमोल आदी कार्यकर्ते व लघुव्यावसायिकांची स्वाक्षरी आहे.