बुलडाणा : पावसाळ्यात दरवर्षी साथींचे आजार डोके वर काढतात. सध्या कोरोनाचे रुग्ण काहीसे कमी झाल्याने निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. काेरेानाची लाट ओसरली असली, तरी पावसाळ्यातील आजार बळावण्याची शक्यता आहे़ त्यामुळे, नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे़ यावर्षी मे महिन्यापर्यंत जिल्ह्यात मलेरिया, डेंग्यू आणि चिकुनगुनियाचा एकही रुग्ण आढळलेला नाही़
पावसाळ्यात मलेरिया, डेंग्यू, टायफॉइड, कॉलरा आदी साथींचे आजार बळावतात. अशावेळी शहरांमधील शासकीय व खासगी रुग्णालयांमध्ये या आजारांच्या रुग्णांची उपचारांसाठी मोठ्या प्रमाणावर झुंबड उडते. ऊन-पावसाच्या खेळामुळे वातावरणात होणा-या बदलांमुळे तापाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळतात.
२०१९ मधील जून ते ऑक्टोबर या पाच महिन्यांतील आढावा घेता विविध तापांचे रुग्ण आढळले होते. दरम्यान, गेल्या वर्षी कोरोना काळात साथीच्या आजारांचा प्रभाव फारसा जाणवला नाही. गेल्या काही वर्षांच्या तुलनेत तेव्हा डेंग्यू, मलेरिया, टायफॉइड, गॅस्ट्रो या साथींचे रुग्ण अत्यल्प प्रमाणात आढळले होते.
गप्पी माशांची पैदास
गप्पी मासे डेंग्यू आणि मलेरियाच्या डासांच्या अळ्या खातात. त्यामुळे जिल्ह्यात गप्पी माशांची पैदास केली जात आहे. ज्या ठिकाणी डासांच्या अळ्या मोठ्या प्रमाणावर आढळतात, तेथे हे गप्पी मासे सोडले जातात. त्यामुळे डासांची पैदास रोखण्यास मदत होते.
ही घ्या काळजी
बदलत्या हवामानात तापाचे रुग्ण आढळतात. अस्वच्छता, साचलेल्या पाण्यात डेंग्यूची पैदास वाढते. नागरिकांनी आपल्या परिसरात कुठेही पाणी साचू देऊ नका, परिसरात स्वच्छता राखा. डासांचा प्रादुर्भाव वाढला असेल तर धूरफवारणी करून घ्या. ताप आल्यास डॉक्टरांशी संपर्क साधून तातडीने रक्तचाचण्या करून घ्या. पाणी उकळून आणि गाळून प्या.
साथरोग कृती आराखड्याची अंमलबजावणी
पावसाळ्याच्या धर्तीवर साथरोग कृती आराखडा तयार केला आहे. आजार होऊ नयेत, यासाठी जागृती केली जाते. सर्वेक्षण व खासगी रुग्णालयात आढळणाऱ्या रुग्णांच्या परिसरात तातडीने प्रतिबंधात्मक कार्यवाही करणे, तापाच्या रुग्णांचे रक्ताचे नमुने तपासणे आदी कार्यवाही साथरोग काळात सुरू असते.
.................बॉक्स.....................
अशी आहे आकडेवारी
पॉझिटिव्ह सॅम्पल (कंसात)
मलेरिया डेंग्यू चिकुनगुनिया
२०१७ ३१ (४६०७५८) ४ (३९) १२
२०१८ २५(४८९१८५) ३६ (१६४) १५
२०१९ १३ (४८८८३३) ३८(१११) २२
२०२० ०५ (३४४६५९) २२(११९) ०३
मे २०२१ (१३१७०५) ०० ०० ००
आता पावसाळ्याला सुरुवात झाली आहे. डेंग्यू व मलेरियाचे कीटक स्वच्छ पाण्यावर वाढतात. यामुळे छतावरील टायर व इतर भांड्यांमध्ये पाणी साचू देऊ नका. घरातील भांडीही आठवड्यातून एकदा रिकामी करून कोरडा दिवस पाळा.
शिवराज चव्हाण, जिल्हा हिवताप अधिकारी