लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : रूग्णाची ने-आण करताना रुग्णवाहिकांचे अव्वाचे सव्वा भाडे आकारण्याला प्रतिबंध घालण्यात आला आहे. त्याशिवाय, रूग्णवाहिकेचे दर निश्चित करण्याचा आदेश एका जनहित याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाने दिल्याने आता ठरलेल्या दरानुसारच रूग्णवाहिका मिळण्याची सोय झाली आहे.बुलडाणा जिल्ह्यातही रुग्णवाहिकेचे दर ठरवून दिले असल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जयश्री दुतोंडे यांनी दिली आहे. रुग्णसेवा देणाऱ्या रुग्णवाहिकेचे दर निश्चित करण्यासाठी मुबंई उच्च न्यायालयात दाखल जनहित याचिकेमुळे परिवहन आयुक्त कार्यालयाने जिल्हा स्तरीय प्रादेशिक परिवहन प्राधिकरण समितीला जिल्हयातील रुग्ण वाहिकेचे दर निश्चित करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार काही जिल्ह्यांनी आधीच दर ठरवून दिले होते. आता त्या ठरलेल्या दरानुसारच रूग्ण किंवा नातेवाईकांकडून रूग्णवाहिका मालकांना भाडे घ्यावे लागणार आहे. जिल्हयातील शहर व ग्रामीण परिसरातील नागरिकांना उत्तम आरोग्य सेवा उपलब्ध व्हावी आणि गंभीर आजाराने ग्रस्त तसेच कोविड-१९ आजाराचा प्रसार काळात माफक दरात रूग्णवाहिका उपलब्ध होणार आहे. जिल्हा प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाकडून रुग्णवाहिकेचे दर निश्चित केले जातात. उच्च न्यायालयाच्या आदेशामुळे ठरलेल्या दरानुसारच भाड्याची वसुली रूग्णवाहिकाधारकांना करता येईल.अकोला, औरंगाबादकडे रूग्णांची धावमार्च महिन्यापासून देशभर कोविड आजाराने थैमान घातले आहे. रुग्ण संख्या लाखांवर पोहचली असून कोरोना पॉझिव्हीह रुग्णांना त्यांच्या घरापासून ते रूग्णालयापर्यंत आणण्यासाठी शासकीय, खासगी रुग्णवाहिकेचा वापर केला जात आहे. बरेच रुग्ण बुलडाणा जिल्ह्यातून अकोला किंवा औरंगाबादकडे धाव घेतात. त्यांना तेथे जाण्यासाठी रुग्णवाहिका लागते. बरेच वेळा रुग्णांच्या नातेवाईकाना रुग्णवाहिकेसाठी ताटकळत राहावे लागत होते. किंवा दराबाबत घासाघिस करावी लागत होती. त्यामुळे दर निश्चित करण्यापूर्वी जिल्हा प्रादेशिक परिवहन प्राधीकरणाने अभ्यास करून दर निश्चित केले आहेत.
बुलडाणा जिल्ह्यासाठी : असे आहेत दर
बुलडाणा जिल्ह्यातून इतरत्र जाण्यासाठी ३०० किमिपर्यंत २४ तासासाठी चार चाकी अॅम्ब्युलंसला १००० रुपये किंवा प्रतिकिमि चार रुपये भाडे ठरले आहे. तर वातानुकुलीतसाठी ११०० रुपये किंवा प्रतिकिमि पाच रूपये प्रमाणे भाडे आकारता येणार आहे. सर्व सुविधा उपलब्ध असलेल्या अॅम्ब्युलंससाठी ३०० किमिपर्यंत २१०० रुपये किंवा ५ रुपये प्रतिकिमि असा शासकीय दर ठरलेला आहे. शासकीय कार्यालयांसोबतच सर्वसामान्य रूग्णांसाठीही हेच दर लागू आहेत. त्याशिवाय, सोयीसुविधांसह १२ तास ८० किमिपेक्षा अधिक तसेच याच प्रकारासाठी २४ तास १२० किमिपेक्षा अधिक अंतरासाठीही भाडे ठरवून देण्यात आले आहे.