मेहकर : तालुक्यातील ४१ ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया नुकतीच पार पडली. या ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाची तीन टप्प्यांत निवडणूक होत आहे. नऊ ते अकरा फेब्रुवारीदरम्यान ही निवडणूक होणार आहे. सरपंचपदाच्या निवडणुकीची तारीख जाहीर होताच इच्छुकांनी सरपंचपदासाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.
मेहकर तालुक्यातील ब्रम्हपुरी, देऊळगाव सकर्षा, देऊळगाव माळी, हिवरा खुर्द, जवळा, कासारखेड, कनका बु., लावणा, लोणी गवळी, मोहना बु., शहापूर, डोणगाव, दादुलगव्हाण, फैजलापूर येथील सरपंच पदाची निवडणूक ९ फेब्रुवारी रोजी होणार आहे. १० फेब्रुवारी रोजी वरुड, विश्वी, आरेगाव, अंजनी बु., बोरी, बोथा, गोमेधर, गजरखेड, गोहोगाव, गणपूर, नायगाव दत्तापूर, पांगरखेड, सावत्रा येथील सरपंच निवडले जाणार आहेत, तर ११ फेब्रुवारी रोजी घाटनांद्रा, मादनी, मांडवा समित डोंगर, मोळा, मोहना खुर्द, नागापूर, सारशिव, शेलगाव देशमुख, सावंगीवीर, शिवाजीनगर, शेलगाव काकडे, शेंदला, उमरा, विवेकानंदनगर येथील सरपंचपदाच्या निवडणुका पार पडणार आहेत. तहसीलदार डॉ. संजय गरकल यांच्या मार्गदर्शनात या निवडणुकीची तयारी सुरू आहे.
राजकीय पक्ष सक्रिय
मेहकर तालुक्यातील मोठ्या ग्रामपंचायतींवर सत्ता मिळवण्यासाठी राजकीय पक्षांनी प्रयत्न सुरू केले आहेत. मेहकर तालुक्यातील देऊळगाव माळी, विवेकानंदनगर, ब्रह्मपुरी, डोणगाव, गोहगाव दांदडे, पांगरखेड, मादणी, लोणी गवळी, कासारखेड, शहापूर या ग्रामपंचायतींमध्ये सरपंचपदी कोणाची वर्णी लागते, याकडे अनेकांच्या नजरा लागून आहेत.