खामगाव: जुन्या वादातून खामगाव तालुक्यातील वरूड येथे सोमवारी सायंकाळी दोन गटात तुफान हाणामारी झाली. यात एका गटातील सहा तर दुसर्या गटातील १३ जण जखमी झाले. यातील सात गंभीर जखमींना तात्काळ अकोला येथे हलविण्यात आले. घटनेची माहिती मिळताच खामगाव ग्रामीण पोलीस घटनास्थळी दाखल झाले. परिसि्थतीवर नियंत्रण मिळविल्याने गावात तणावपूर्ण शांतता असल्याचे समजते.
याबाबत प्राप्त माहितीनुसार खामगाव तालुक्यातील वरूड येथे दोन गटात गत काही दिवसांपासून वाद धुमसत आहे. या वादातून काही दिवसांपूर्वीच काहींिवरोधात खामगाव ग्रामीण पेालीसांत अदखल पात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, सोमवारी पुन्हा या दोन्ही गटात वाद उफाळून आला. वादाचे पर्यवसन सशस्त्र हाणामारीत झाले. यात एका गटातील एकनाथ रामदास कोकाटे ४०, वैष्णवी विकी कोकाटे २४, शारदा एकनाथ कोकाटे ३२, शुभांगी मारोती कोकाटे ३२, अविनाश भानुदास कोकाटे २६, आकाश भानुदास कोकाटे २३, मारूती वासुदेव कोकाटे ४०, लोकेश श्रीकृष्ण कोकाटे २३, योगेश श्रीकृष्ण कोकाटे २६, संतोष गजानन कोकाटे २६, रूपेश वासुदेव काकाटे ६० जखमी झाले. तर दुसर्या गटातील मंगेश रमेश तायडे ३६, पूजा मंगेश तायडे २४, ललिता भीमराव सोनोने ५५, सागर भीमराव सोनोने ३२, विशाल भीमराव सोनोने ४०, कु. तपस्या विशाल सोनोने वय १२ असे एकुण १९ जण जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
जखमींना तात्काळ खामगाव येथील सामान्य रूग्णालयात आणण्यात आले. यात प्रकृती अत्यवस्थ झाल्याने मंगेश रमेश तायडे, सागर भीमराव साेनोने, विशाल भीमराव सोनोने, एकनाथ रामदास कोकाटे, लोकेश श्रीकृष्ण कोकाटे, आकाश भानुदास कोकाटे, पूजा मंगेश तायडे यांना अकोला येथे हलविण्यात आले. याप्रकरणी पुढील कारवाई खामगाव ग्रामीण पोलीसांकडून केली जात आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस स्टेशनचे निरिक्षक शांतीकुमार पाटील आपल्या पथकासह सामान्य रूग्णालयात पोहोचले होते. गावात चोख पोलीस बंदोबस्त लावण्यात आला असून, घटनास्थळी खामगाव ग्रामीण पोलीस स्टेशनचे निरिक्षक सुरेश नाईकनवरे यांच्यासह दंगाकाबू पथक दाखल झाले होते. उपविभागीय अधिकारी विनोद ठाकरे देखील घटनास्थळी भेट देत परिस्थिती जाणून घेतली.