चिखली (जि. बुलढाणा) : शहरातील प्रभाग क्रमांक १० मधील ८ वर्षीय चिमुकल्याचा घटसर्पाच्या (डिप्थेरिया) प्रादुर्भावामुळे मृत्यू झाल्याची घटना शनिवारी घडली. या घटनेतील मृतक बालकाचे नाव जैद खान अन्सार खान कुरेशी, असे आहे.
येथील अन्सार खान कुरेशी यांचा आठ वर्षीय चिमुकला जैद खान कुरेशी याला गत शनिवारी घशाचा संसर्ग झाल्याने उपचारासाठी खासगी बालरोग तज्ज्ञाकडे नेण्यात आले; मात्र संसर्ग कमी झाला नसल्याने त्यास बुलढाणा येथील खासगी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, तेथेही जैदच्या प्रकृतीत कोणतीही सुधारणा न झाल्याने डॉक्टरांनी त्याला छत्रपती संभाजीनगर येथे नेण्याचा सल्ला देण्यात आला. त्याअनुषंगाने जैदला त्याच्या कुटुंबीयांनी घाटी रुग्णालयात दाखल केले. येथील उपचारादरम्यान जैदला घटसर्पाची (डिप्थेरिया) लागण झाल्याचे निदान झाल्याने त्याअनुषंगाने डॉक्टरांनी उपचार चालविले होते. मात्र, उपचारादरम्यानच जैदचा ३ ऑगस्टच्या पहाटे चार वाजेच्या सुमारास मृत्यू झाला. या घटनेने आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाने तातडीने या भागातील डॉ. हुसेन उर्दू शाळेतील सर्व विद्यार्थ्यांसह प्रभाग १० मधील बालकांची तपासणी लसीकरणाचे काम हाती घेतले आहे.
घटसर्प (डिप्थेरिया) कशामुळे होतो?घटसर्प (डिप्थेरिया) हा कॉनेबॅक्टेरियम या जीवाणूमुळे होणारा संसर्गजन्य जीवाणू रोग आहे. डिप्थेरिया हा सहसा १ ते ११ वर्षांतील मुलांना होतो. याच्या संसर्गामुळे घशाच्या मागच्या बाजूला जाड आवरण येते, ज्यामुळे खायला आणि गिळायला खूप त्रास होतो. सामान्यत: जंतूमुळे नाक आणि घशावर परिणाम होतो.
ही आहेत लक्षणेताप येणे, थंडी वाजणे, सतत खोकला होणे, लाळ गळणे, घशात खवखवणे, गिळायला त्रास होणे, नाकातून पाणी गळणे किंवा रक्तस्त्राव होणे, त्वचेवर व्रण येणे. बालकाचा मृत्यू नेमका कोणत्या कारणामुळे झाला, याचा तपास सुरू आहे. तरीही खबरदारीचा उपाय म्हणून आरोग्य पथके स्थापन केली असून, मृतांच्या नातेवाइकांना एरिथ्रो मायसिन औषध देण्यासह या भागातील सर्व बालकांचे लसीकरणाची मोहीम हाती घेण्यात आली आहे.-डॉ. अमोल गीते, जिल्हा आरोग्य अधिकारी, बुलढाणा घटना अत्यंत वेदनादायी आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाने तातडीने कारवाई करण्याबाबत निर्देश दिले आहेत. पालकांनी जागरूकतेने पाल्यांना लसीकरण करावे. कोणतीही अडचण आल्यास माझ्याशी थेट संपर्क साधावा.-श्वेता महाले, आमदार, चिखली