बुलढाणा : तालुक्यातील देऊळघाट गावासाठीची पूरक पाणीपुरवठा योजना ग्रामपंचायतीचे दुर्लक्षीत व मनमानी कारभारामुळे बंद पडलेली असतानाच पाण्यासाठी गेलेल्या आठ वर्षीय बालिकेचा विहीरीत पडून मृत्यू झाला. त्यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी ५ एप्रिल रोजी बसस्थानकावर रास्तारोको केला.
दरम्यान ग्रामस्थांच्या संतप्त भावना पहाता प्रशासकीय अधिकाऱ्यांनी धाव घेत देऊळघाट गाठत समजावण्याचा प्रयत्न केला. परंतू कायमस्वरुपी पाणीपुरवठा योजनेसाठी देऊळघाट ग्रासस्थ आक्रमक झाले आहे. दुपारी चार पर्यंत ग्रामस्थांचे रास्तारोको आंदोलन सुरूच होते तर प्रशासकीय अधिकारी त्यांना समजावण्याचा प्रयत्न करत होते.
बुलढाणा तालुक्यातील देऊळघाट गावात पाणीटंचाईची समस्या आहे. या गावात पाणीपुरवठा करण्यासाठी येळगाव धरणातून पूरक नळ योजना टाकलेली आहे. या नळ योजनेतंर्गतगावात अनेक ठिकाणी नळ उभारण्यात आले आहेत. त्याद्वारे नागरिकांना पाणीपुरवठा होत होता. परंतु देऊळघाट ग्रामपंचायत प्रशासनाने मनमानी कारभार करत ही नळ योजनाच बंद पाडल्याची ग्रामस्थांची अेारड आहे. त्यामुळे लोकांना पाणी मिळत नसल्याने टंचाई निर्माण झाली असून पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे किंवा पाणी विकत घ्यावे लागत आहे.
दरम्यान ४ एप्रिल रोजी ८ वर्षीय अंजली भरत शेजोळ ही मुलगी गावातील धनगर वाड्यात असलेल्या विहिरीवर पाणी घेण्यासाठी गेली असता तोल जाऊन विहिरीत पडून गंभीर जखमी झाली होती. तिला प्रथम बुलढाणा आणि नंतर अैारंगाबाद येथे उपचारासाठी हलविण्यात आले. मात्र उपचारादरम्यानच तिचा मृत्यू झाला. ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे एका लहान मुलीला जीव गमवावा लागला असा आरोप करत संतप्त नागरिकांनी ५ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजेपासून देऊळगाट येथील बसस्थानकासमोर रास्तारोको आंदोलन सुरू केले आहे. जोपर्यंत देऊळघाटला कायमस्वरूपी पाणी मिळत नाही तोपर्यंत माघार घेणार नाही, अशी भूमिका गावकऱ्यांनी घेतलेली आहे. घटनेचे गांभिर्य पहाता अधिकाऱ्यांनी देखील देऊळघाट गाठले असून आंदोलकांना समजावण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.