एकलारा बानोदा (बुलढाणा) : शेतात कापूस वेचणीसाठी जात असलेल्या अल्पवयीन मुलीचा लगतच्या गावातील अल्पवयीन आरोपीने विनयभंग केल्याची घटना संग्रामपूर तालुक्यातील एका गावात २० मार्च रोजी घडली. तक्रारीवरून पोलिसांनी विधीसंघर्षग्रस्त बालकाविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला.
संग्रामपूर तालुक्यातील एका गावातील १४ वर्षीय मुलीने तामगाव पोलिसात तक्रार दिली. त्यामध्ये घटनेच्या दिवशी सकाळी माळेगाव रस्त्याने तिच्या शेतात कापूस वेचणीसाठी शेतात जात होती. त्यावेळी विधीसंघर्षग्रस्त बालक दुचाकीने तेथे आला, तू माझी राणी आहेस, चल माझ्यासोबत पळून जाऊन लग्न करू, असे तिला म्हटले. तसेच दुचाकीवरून खाली उतरून तिला वाईट उद्देशाने विनयभंग केला. सोबतच मुलीच्या भावाच्या मोबाइलवर आरोपीने त्याच्यासह मुलीचा फोटो पाठविला अन् लगेच डिलीट केला.
तसेच फिर्यादीच्या आईच्या मोबाइलवर व्हिडिओ कॉल करून मुलीला पळवून नेणार आहे, तिला येऊ न दिल्यास कुटुंबातील सदस्यांना ठार मारणार आहे, अशी धमकी दिली. या तक्रारीवरून तामगाव पोलिसांनी विधीसंघर्षग्रस्त बालकावर भादंविच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक दीपक सोळंके यांच्या मार्गदर्शनात बीट जमादार वावगे करीत आहेत.