अनिल गवई
खामगाव : सुप्रसिध्द नायक या हिंदी सिनेमात एक दिवसाचा मुख्यमंत्री म्हणून प्रेस छायाचित्रकार असलेल्या अनिल कपूर यांनी अदा केलेली भूमिका अनेकांनी अनुभवली. सिनेमाच्या कथानकाला साजेचा प्रत्यय बुधवारी शहर पोलीस स्टेशनमधील पोलीस उपनिरिक्षक राची पुसाम यांनी अनुभवला. निमित्त होते ते जागतिक महिला दिनाचे. पोलीस उपनिरिक्षक असलेल्या राची पुसाम यांना एक दिवसांचे ठाणेदार बनवित, शहर पोलीस निरिक्षक शांतीकुमार पाटील यांनी पुसाम यांच्यासह पोलीस स्टेशनमधील कार्यरत सर्वच महिला पोलीसांचा सन्मान केला.
खामगाव शहरातील मोठे पोलीस स्टेशन असलेल्या शहर पोलीस स्टेशनच्या निरक्षक पदाचा पदभार बुधवारी पोलीस उपनिरिक्षक राची पुसाम यांना देण्यात आला. त्याचवेळी पोलीस स्टेशनमधील सर्वच महत्वाच्या जबाबदार्या या महिलांच्या हाती देण्यात आल्या. पोलीस उपनिरिक्षक असलेल्या राची पुसाम यांना जागतिक महिला दिनानिमित्त शहर पोलीस स्टेशनचे निरिक्षक बनविण्यात आले. पोलीस निरिक्षक शांतीकुमार पाटील यांच्या संकल्पनेतून मातृशक्तीचा येथे विशेष सत्कारही करण्यात आला. त्याचवेळी डायरी अंमलदार म्हणून संध्या ताटरकार आणि ठाणा हजेरी सीसीटीएनएस या पदाची धुरा नापोकॉ सुनिता कश्यप यांच्या खांद्यावर देण्यात आली. महिलादिनानिमित्त बुधवारी दिवसभर खामगाव शहर पोलीस स्टेशनचे कामकाज महिला अधिकार्यांनीच पाहीले. पोलीस निरिक्षक पाटील यांच्या मार्गदर्शना सायंकाळी उशीरापर्यंत पोलीस स्टेशनची धुरा महिलांनी यशस्वीपणे सांभाळली.
महिला पोलीसांनीच सांभाळले ठाणे
खामगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये जागतिक महिला दिनी संपूर्ण पोलीस ठाण्याचा कारभार महिलांनीच साभांळला. स्टेशन डायरी यासह विशेष जबाबदार्या महिलांच्या खाद्यांवर देत, शहर पोलीसांकडून महिला पोलीसांचा यथोचित सन्मान करण्यात आला.
शहर पोलीस स्टेशनची एक दिवसाची निरिक्षक म्हणून धुरा सांभाळण्याचा वेगळा अनुभव आज घेता आला. आपल्यासह इतरही महिला पोलिसांना वरिष्ठांकडून सकारात्मक दृष्टीकोनातून यथोचित सन्मान करण्यात आला. खाकीतील अधिकार्यांनी आपल्या सहकार्याप्रती व्यक्त केलेली कृतज्ञता कायम स्मरणात राहील. आजचा महिला दिन आपल्यासाठी विशेष अनुभव देऊन गेला.
राची पुसामएक दिवसाच्या महिला पोलीस निरिक्षक, खामगाव शहर