लोकमत न्यूज नेटवर्क खामगाव : ग्रामीण भागातील अंगणवाड्यालगतच्या शाळांना आता लिंक करण्यात येणार आहे. अंगणवाडी अधिक दर्जेदार करण्यासोबतच जिल्हा परिषदेतील शाळांमधील विद्यार्थी संख्या वाढविण्याचा हेतू यामागे असल्याचे शिक्षण विभागातील अधिकाऱ्याने सांगितले.ग्रामीण भागातील मुलांच्या शिक्षणाची सुरुवात अंगणवाडीपासून होते. त्यामुळे या अंगणवाडी दर्जेदार असायला पाहिजेत. त्यासाठी अंगणवाडीमध्येच मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळण्यावर विभागाचा भर असणार आहे. सद्य:स्थितीत मोजक्याच अंगणवाड्यांची स्थिती चांगली आहे. अनेक अंगणवाड्या भाड्याच्या इमारतीत आहेत. काही मदतनिसांच्या घरीच भरतात तर काही ग्रामपंचायत, समाजमंदिर आदी सार्वजनिक ठिकाणी भरत आहेत. एक शाळा एक अंगणवाडी किंवा एक शाळा दोन-तीन अंगणवाड्या या तत्त्वावर अंगणवाड्या शाळांना लिंक करण्याचे आदेश शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव वंदना कृष्णा यांनी नुकतेच दिले आहेत. त्यामुळे २ हजार ७७२ अंगणवाड्या या लगतच्या शाळांना लिंक करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. शासनाच्या वतीने शाळांसाठी निधी देण्यात येतो. याचा उपयोग अप्रत्यक्षपणे अंगणवाड्यांना होणार आहे.
जिल्हा परिषद शाळांना अंगणवाडी होणार लिंक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 10:07 AM