खामगाव: शहरातील प्रभाग क्रमांक ११ आणि १२ मध्ये स्वच्छता होत नाही. त्यामुळे नागरिकांना दुर्गंधी आणि अस्वच्छतेचा सामना करावा लागत असल्याने संतप्त झालेल्या नागरिकांनी मंगळवारी सकाळी ११ वाजता नगर पालिका आवारात नालीतील घाण टाकली. यावेळी मुख्याधिकारी, उपमुख्याधिकारी आणि आरोग्य विभागातील कर्मचाºयांशी संबंधितांनी वादही घातला. मंगळवारी शहरात अवकाळी पावसाने धुमाकुळ घातला. पावसामुळे नाल्यातील घाणपाणी दाळफैल भागातील काही नागरिकांच्या घरात घुसले. दरम्यान, परिसरातील नाल्यांची स्वच्छता होत नसल्यामुळेच घरात घाण पाणी शिरले. परिसरातील नाल्यांच्या स्वच्छतेकडे नगर पालिका प्रशासनाकडून दुर्लक्ष केल्याचा ठपका ठेवत, दाळफैलातील महिला आणि पुरूषांनी नगर पालिकेत धडक दिली. यावेळी सोबत आणलेली नाल्यातील घाण नगर पालिका आवारात फेकली. तसेच घाणीची एक बाटली मुख्याधिकारी आणि उपमुख्याधिकारी यांच्या दालनाकडे नेली. नागरिकांच्या या आंदोलनामुळे पालिकेत एकच खळबळ उडाली होती. यासंदर्भात नगर पालिका प्रशासनाकडून शहर पोलिसात तक्रार दाखल केली.
महात्मा गांधीच्या पुतळ्यासमोर घाण!
संतप्त आंदोलकांनी पालिका आवारात घाण फेकताना महात्मा गांधी यांच्या पुतळ्या समोरही घाण फेकली. त्यामुळे महात्मा गांधी पुतळ्यासोबतच नगर पालिकेच्या या घाणीची आवारात दुर्गंधी सुटली होती. आवारात घाण फेकल्यानंतर आंदोलकांनी आपला मोर्चा मुख्याधिकारी, उपमुख्याधिकारी यांच्या दालनाकडे वळविला.
पोलिसांचा पालिकेत ठिय्या!
प्रभाग क्रमांक ११ आणि १२ मधील दाळफैल भागातील महिला आणि पुरूषांनी नगर पालिकेत घाण फेकल्याची माहिती मिळताच शहर पोलिस स्टेशनचे पथक पालिकेत धडकले. तत्पूर्वीच वाहतूक पोलिसही पालिकेत आले. त्यामुळे आंदोलकांच्या भावनांना आवर घालणे शक्य झाले. पोलिसांनी आंदोलकांना मुख्याधिकाºयांच्या दालनातून बाहेर काढल्यानंतर आंदोलकांनी पालिकेच्याप्रवेशद्वारावर निदर्शने केली.