उटी येथील शेतकऱ्यांनी २ सप्टेंबरला मेहकर तालुका कृषी अधिकारी यांच्या कार्यालयात जाऊन २४ ऑगस्ट रोजी दिलेल्या तक्रार अर्जाबाबत विचारणा केली; पण कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक व संबंधित कृषी सहायकही त्यांना भेटले नाहीत. उटी येथील शेतकऱ्यांचे फळबाग योजनेतील कृती आराखड्यात नावे असून, फळबाग अनुदानासाठी कृषी सहायक यांनी काही शेतकऱ्यांकडून पाच हजार रुपये घेऊन कोणत्याच प्रकारचे काम केले नाही असा शेतकऱ्यांचा आरोप आहे. याबाबतची तक्रार २४ ऑगस्ट रोजी शेतकऱ्यांनी केली होती. त्यावरही चौकशी झाली नाही. त्यामुळे उटी येथील काही शेतकरी तालुका कृषी अधिकारी यांना भेटायला गेले असता त्यांची भेट होऊ शकली नाही तथा संपर्कही हाेऊ शकला नाही. त्यामुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांनी सरळ आपला राग तालुका कृषी अधिकारी कार्यालयावर काढला. तेथील खुर्च्या, टेबल, काचा फोडून आपला राग व्यक्त केला. यावेळी संतप्त शेतकऱ्यांनी सांगितले की, कृषी सहायकावर कारवाई न केल्यास तसे शेतकऱ्यांना अनुदान न मिळाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. या तोडफोड प्रकरणी मेहकर कृषी अधिकारी कार्यालयात प्रभारी तालुका कृषी अधिकारी किशोर काळे यांच्याशी संपर्क साधला असता ते उपलब्ध होऊ शकले नाहीत.--
---
फळबाग लागवडीसंबंधी विभागाचे अनेक नियम आहेत. या नियमांना धरूनच फळबाग लागवड करता येते. याबाबत संबंधित शेतकऱ्यांना कळविण्यात आले आहे. या शेतकऱ्यांना बैठकीत हा विषय समजावून सांगण्यात येईल.
- प्रवीण गाडेकर, मंडळ कृषी अधिकारी, जानेफळ.